आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड बायपास रोडवर सुसाट वेगाचा बळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भरधावपल्सर दुचाकी दुभाजकावर आदळून तरुण जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी दुपारी १.५० वाजता बीड बायपासवर घडली. गजानन नारायण गवारे (२५, रा. वाघाळा, ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा) असे त्या तरुणाचे नाव आहे. तो आई-वडिलांना भेटण्यासाठी शहरात आला होता. सातारा पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार गजाननचे आई-वडील शहाशोक्ता दर्ग्याजवळ भाड्याने राहतात. पाऊस नसल्यामुळे शेतीची कामे बंद आहेत. त्यामुळे तो आई-वडिलांना भेटण्यासाठी चार दिवसांपूर्वी वाघाळा येथून आला होता. सोमवारी सकाळी त्याने दाढी, कटिंग करून येतो म्हणून आईला सांगितले. भाऊजीची काळ्या रंगाची पल्सर २२० सीसी दुचाकीने (एमएच २०, एके ८०९१) घराबाहेर पडला.
महानुभाव पंथ चौकात दाढी, कटिंग करून घराकडे निघाला. तो इतक्या भरधाव वेगात होता की बाजूने गेल्यामुळे आम्ही घाबरून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मारुती शोरूमजवळ आल्यानंतर भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटून तो दुभाजकावर आदळला. त्यानंतर उजव्या बाजूला फेक लागेला. यात त्याचा मेंदू बाहेर पडला. अपघाताची माहिती सातारा पोलिसांच्या टू मोबाइलला मिळताच पोलिसांनी त्याला घाटीत दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मंगळवारी गजाननचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यानंतर त्याच्यावर वाघाळा येथे अत्यसंस्कार करण्यात येतील.

एकुलता एक होता गजनान
गजाननचे वडील माजी सैनिक आहेत. ते एका खासगी कंपनीत वॉचमनचे काम करतात. तो एकुलता एक मुलगा होता. त्याचे लग्न झाले असून त्याला दोन मुले, पत्नी आहे. तो वाघाळा येथील एकर शेती बघायचा. मात्र, पावसाने दडी मारल्याकडे शेतात कोणतीच कामे नव्हती. गावात मन लागत नव्हते. त्यामुळे आई-वडिलांना भेटून येऊ म्हणून तो औरंगाबादला आला होता.

भाऊजींची होती पल्सर
गजाननच्या भाऊजींनी बँकेच्या हप्त्यावर पल्सर गाडी घेतली होती. त्याचे हप्ते थकले होते. त्यामुळे त्यांनी शिवनागिरी (जि. जालना) येथून सासऱ्याच्या घरी पल्सर आणून ठेवली होती. ती पल्सर घरी असल्याने गजाननने ती बाहेर काढली अन् जीव गमावून बसला.
आई-वडील, बहिणीने फोडला हंबरडा
आई-वडील बहिणीने ‘गजू, आम्ही कुणाला हाक मारायची रे...’ म्हणत हंबरडा फोडला. वडील रडत-रडत नातेवाइकांना फोनवरून सांगत होते, आपला गजू गेला. मी काय करू? देवा, गजूऐवजी मला घेऊन जायचे होते, असे म्हणत ते आक्रोश करत होते.