आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाचा संसार बहरला; पण त्याच्या वरातीने दुसऱ्याचा उजाडला- जालना रोडवर अपघात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी रात्री नऊला देवळाई चौकात वाहतूक कोंडी झाली होती. बेशिस्तपणे धावणारी वाहने पाहून तेथे उपस्थित वाहतूक पोलिसही हतबल दिसत होता. छाया : रवी खंडाळकर - Divya Marathi
रविवारी रात्री नऊला देवळाई चौकात वाहतूक कोंडी झाली होती. बेशिस्तपणे धावणारी वाहने पाहून तेथे उपस्थित वाहतूक पोलिसही हतबल दिसत होता. छाया : रवी खंडाळकर
औरंगाबाद- एकजोडपे सुखी वैवाहिक जीवनाच्या वाटेवर असतानाच दुसऱ्या तरुणाच्या आयुष्याची दोर कापली केली. जालना रोडवरील औरंगाबाद जिमखान्यासमोर लग्नाच्या वरातीमुळे वाहतुकीची कोंडी होऊन गर्दीतून वाट काढण्याच्या प्रयत्नात हा तरुण जीव गमावून बसला. वाहतुकीत अडकलेले पाण्याचे टँकर मागे आल्याने मागचे टायर त्याच्या छातीवरून गेल्याने त्याचा श्वास जागीच थांबला. ही घटना रविवारी रात्री आठच्या सुमारास घडली. बबन खडके (४०, रा. चिकलठाणा) असे मृताचे नाव आहे. ही दुर्दैवी घटना घडूनही रात्री दहापर्यंत एमआयडीसी सिडको पोलिसांना घटनेचा मागमूसही नव्हता.

बबन खडके हे पीव्हीआरमध्ये हाऊसकीपिंग विभागात काम करत होते.रात्री आठच्या सुमारास काम संपवून ते चिकलठाण्याकडे पायी जात होते. जिमखाना येथे होत असलेल्या लग्नाची वरात रस्त्यावर असल्याने पीव्हीआर ते जिमखान्यापर्यंत वाहतुकीची कोंडी झाली होती. खडके रस्ता ओलांडून पलीकडे जाण्याच्या प्रयत्नात होते. ट्रक आणि चारचाकीमुळे ते दुभाजकाकडे दाबले गेले. तेवढ्यात समोर असलेला मनपाचा पाण्याचा टँकर (एमएच २० १९९९) चालकाने थोडा मागे घेतला. धक्क्यामुळे ते खाली पडले. पडलेली व्यक्ती उठून समोर गेल्याचे चालकाला वाटल्याने त्याने टँकर आणखी मागे घेतला आणि टँकरचे मागचे चाक खडके यांच्या छातीवरून जाऊन त्यांचा जागीच अंत झाला. स्थानिक रहिवासी शिवसेनेचे पदाधिकारी ज्ञानेश्वर डांगे काकासाहेब काकडेंसह इतर लोकांनी त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच भारतीय जनता युवा मोर्चाचे राहुल चौधरी हेदेखील घटनास्थळी पोहोचले होते. बबन यांच्या पश्चात पत्नी, १३ आणि १६ वर्षांची दोन मुले आहेत.
नेमक्या वेळी पोलिस कुठे असतात?
शहरात हेल्मेटसक्ती आणि रिक्षांवर कारवाई करण्यासाठी सरसावणारे वाहतूक शाखेचे कर्मचारी वाहतूक कोंडीच्या वेळी कुठे असतात, हे एक कोडेच आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या. देवळाई चौकात एक किलोमीटरपर्यंत वाहतुकीची कोंडी झाली होती. ती फोडण्याकरिता अवघे तीन ते चार कर्मचारी दिसत होते. पीव्हीआरसमोर वाहतूक सुरळीत करण्यासाठी कोणीही नव्हते. घटना घडून दोन तास उलटले तरी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याला घटनेची माहिती नव्हती.

लग्न, वरातींमुळे शहराच्या चारही बाजूंना वाहतूक कोंडी
रविवारीमोठ्या प्रमाणात लग्ने होती. उन्हामुळे बहुतांश लोकांनी संध्याकाळचा मुहूर्त निवडला. त्यामुळे सहा ते नऊपर्यंत शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाली होती. मंगल कार्यालयांसमोरील रस्ते गजबजलेले होते. बीड बायपासवर तर एक किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग लागली होती. जालना रोड, वाळूज रोडवरही हीच स्थिती होती.