आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Account Hack News In Marathi, Debt Card, SMS, Divya Marathi, Aurangabad

तुमच्या बँक खात्यातून 52 हजार रुपये डेबिट करण्यात आले आणि झोप उडाली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - ‘तुमच्या बँक खात्यातून 52 हजार रुपये डेबिट करण्यात आले आहेत’ अशा आशयाचा एसएमएस रात्री दोन वाजता आला आणि एमआयटी महाविद्यालयाच्या एका प्राध्यापकाची खाडकन झोप उडाली. अकाउंट हॅक झाल्याची शंका त्यांना आली. सकाळी बँक उघडेपर्यंत त्यांनी कशीबशी वाट पाहिली. साडेदहाला बँकेत जाऊन पाहतात तर असाच मेसेज आल्याने हादरलेले एमआयटीचे अनेक कर्मचारी तेथे हजर होते. अखेर बँकेने आणि महाविद्यालयाने बदललेल्या खात्याच्या प्रकारातून ही घटना घडली आणि कर्मचार्‍यांपर्यंत ती न पोहोचल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. रात्री उशिरापर्यंत 377 कर्मचार्‍यांच्या खात्यांत काढलेली रक्कम वर्ग करण्याचे काम सुरू होते.


एमआयटीच्या 500 च्या आसपास कर्मचार्‍यांचे वेतन खाते महाविद्यालय परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत आहे. गेल्या महिन्यात सेव्हिंग खाती कॉर्पोरेट सॅलरी खात्यांत वर्ग करण्यात आली. त्यानुसार कर्मचार्‍यांना अधिक सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यातीलच एक फ्लेक्झिबल फिक्स डिपॉझिटची योजना आहे; पण या योजनेबाबत एमआयटीच्या कर्मचार्‍यांना पूर्वसूचना दिली नाही. त्यामुळे ही योजना 25 मार्चपासून अँक्टिव्हेट करण्यास बँकेने सुरुवात केली. खाती नव्या योजनेत वर्ग केली आणि संगणकाने 15 हजार रुपयांच्या वर असणारी 377 जणांच्या खात्यातील रक्कम फिक्स डिपॉझिट योजनेत टाकली.


एका प्राध्यापकाचे तर 5 लाख 20 हजार रुपये डेबिट झाले. त्यांची अवस्था तर खूपच वाईट बनली. काहींनी रात्रीच एटीएमवर जाऊन खात्री करून घेतली. काही जणांनी अकाउंट हॅक झाल्याचा ग्रह करून घेतला. सकाळी काही कर्मचार्‍यांनी सायबर क्राइम शाखेकडे धाव घेत गार्‍हाणे मांडले.बँक म्हणते सॉरी, व्यवस्थापन म्हणते संभ्रम झाला
एमआयटीचे कर्मचारी प्रशांत पाटील, अरविंद नागरिक आणि सय्यद मोहसीन यांनी सांगितले की, पैसे कशाचे कापले, का कापले याचा काहीच उल्लेख मेसेजमध्ये नसल्याने सगळेच हादरले. महाविद्यालय व्यवस्थापनाने केलेल्या बदलाची माहितीच नसल्याने हा प्रकार परस्पर झाला. व्यवस्थापक सिंह म्हणाले की, बँकेच्या वतीने या नव्या कॉर्पोरेट खात्यांबाबत सक्यरुलर गेल्या महिन्यातच काढण्यात आले होते. ते महाविद्यालयाने सर्वांपर्यंत पोहोचवले असेल असे आम्ही समजून चाललो. त्यानुसार ही खाती वर्ग करण्यात आली. आपण या प्रकाराबाबत ग्राहकांची दिलगिरी व्यक्त केली असून आता प्रत्येकाची व्यक्तिगत मान्यता घेऊनच ही खाती वर्ग केली जातील. सर्व ग्राहकांचे पैसे सुरक्षित आहेत. एमआयटीचे महासंचालक मुनीश शर्मा यांनी सांगितले की, महाविद्यालयाचे खाते कॉर्पोरेट खात्यांत वर्ग करण्यात आले आहे. त्या संदर्भात संभ्रम निर्माण झाल्याने हा प्रकार घडला. मात्र, कुणाचेही पैसे कुठे गेलेले नाहीत.


काय आहे कॉर्पोरेट सॅलरी योजना : मोठय़ा आस्थापनांसाठी सुरू करण्यात आलेल्या योजनेतून ग्राहकांना अधिकचे लाभ देणारी कॉर्पोरेट सॅलरी अकाउंट योजना आहे. त्यात ग्राहकाचा विमा, एटीएम वापरावरील शुल्कात माफी असे फायदे आहेत. मात्र, खात्यातील निर्धारित रकमेपेक्षा अधिक रक्कम आपोआप फिक्स डिपॉझिट करणारी फ्लेक्झी फिक्स डिपॉझिट योजना महत्त्वाची आहे. त्यानुसार 15 हजार रुपयांपेक्षा अधिक असणारी या खात्यांवरील रक्कम आपोआप फिक्स डिपॉझिट केली जाते. वार्षिक 9 टक्के दराने त्यावर व्याज मिळते व जेव्हा ग्राहक पैसे काढायला येतो तेव्हा या एफडीतील रक्कम तिकडे वळती होते.


कुणी काय करायला हवे होते
आज झालेल्या प्रकाराबाबत ‘दिव्य मराठी’शी बोलताना सेवानिवृत्त उपप्रबंधक गिरीश धर्माधिकारी यांनी सांगितले की, ही योजना अतिशय चांगली असली तरी ती ग्राहकांपर्यंत न पोहोचवल्याने हा प्रकार झाला. मुळात एक रुपयाही डेबिट करायचा असेल तर ग्राहकांना कळवणे बँकेला बंधनकारक आहे. त्यामुळे या योजनेत खाती वर्ग झाल्यावर तसे कळवण्यात आले. बँकेने ही योजना राबवण्याआधी ग्राहकांशी वैयक्तिक संपर्क साधून त्यांना माहिती देणे आवश्यक होते. अशा स्थितीत बँक, महाविद्यालय आणि कर्मचारी यांची एक संयुक्त बैठक घेऊन या योजनेची माहिती द्यायला हवी होती.


ग्राहकांनी काय काळजी घ्यावी
0वेळेवर आणि नियमित पासबुक अपडेट करून घेत जावे; जेणेकरून आथिर्क व्यवहार कसे होत आहेत ते लक्षात येते.
0इंटरनेट बँकिंग करणार्‍या ग्राहकांनी नियमित कालावधीनंतर खात्याचे स्टेटमेंट काढून त्याची पडताळणी करायला हवी.
0बँकांकडून व्यवहारांचे एसएमएसवर तपशील पाठवले जातात. जर अशी यंत्रणा सुरू केली नसेल तर आवर्जून सुरू करून घ्यावी.


कर्मचार्‍यांनी विचारला व्यवस्थापकांना जाब
बँकेत शाखा व्यवस्थापक मनोजकुमार सिंह यांच्याकडे सकाळपासून कर्मचार्‍यांनी गर्दी करीत जाब विचारला. अनेकांनी एटीएमच्या पावत्या आणून दाखवत आमच्या पैशाचे काय झाले ते विचारले. अखेर सर्व 377 कर्मचार्‍यांच्या आधीच्याच साध्या खात्यात पैसे वर्ग करण्याचे काम सुरू करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते.