आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाटीतून पसार खुनातील आरोपी पहाटेच पोलिस आयुक्तांच्या बंगल्यावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपी मुकेशला (मध्यभागी)अटक करून नेताना पोलिस. - Divya Marathi
आरोपी मुकेशला (मध्यभागी)अटक करून नेताना पोलिस.
औरंगाबाद - घाटीच्या एक्सरे विभागातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेला खुनातील आरोपी मुकेश ऊर्फ रमेश सुखदेव लाहोट (३६ रा. पडेगाव) हा दुसऱ्या दिवशी, मंगळवारी पहाटे चार वाजता पोलिस आयुक्तांच्या बंगल्यावर हजर झाला. प्रथम त्याने स्वत:ची ओळख दिली नाही म्हणून निवासस्थानावर तैनात पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. अहो, साहेब घाटीतून पळून गेलेला मीच तो खून प्रकरणातील आरोपी आहे. कसेही करा मला आयुक्त साहेबांना भेटू द्या, हे शब्द त्याच्या तोंडून ऐकताच पोलिस कर्मचारी उडाले. त्यांना तत्काळ पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या कानावर ही बाब घातली. पोलिस आयुक्तांनीदेखील तितक्याच तत्परतेने आरोपीची भेट घेतली आणि त्याची चौकशी करून गुन्हे शाखेच्या स्वाधीन केले.
 
छावणी पोलिस ठाण्यात मुकेशवर खुनाचा गुन्हा दाखल आहे. प्रकृती बरी नसल्याचे सांगून तो काही दिवसांपासून घाटीत उपचार घेत होता. सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास त्याला एक्सरे काढण्यासाठी नेत असताना पोलिसांच्या हातून पसार झाला होता. ही बाब कळताच शहरातील सर्व पोलिस ठाण्यांना त्याची सूचना देण्यात आली. बेगमपुरा पोलिस ठाणे गुन्हे शाखेचे सर्व पथक त्याला रात्रभर शोधत होते, मात्र तो सापडला नाही. पहाटे चार वाजता तो स्वत:हून पोलिस आयुक्तांच्या बंगल्यावर हजर झाला आणि पोलिसांचा शोध संपला.
 
घरीगेला, कपडे बदलले आणि दुचाकीवरून फिरू लागला : घाटीतूनपसार होताच तो रिक्षाने पहाडसिंगपुऱ्यातील त्याच्या घरी गेला. कपडे बदलले आणि दुचाकीवर पत्नीला सोबत घेऊन वैजापूरकडे गेला. मध्ये त्याने एका पंपावर पेट्रोलही टाकले. त्यानंतर वैजापूरला गेला तेथून लासूर स्टेशनला आला. रात्रभर तो दुचाकीवर फिरत होता. अखेर चार वाजता पोलिस आयुक्तांच्या निवासस्थानासमोर गेला. पण बाहेर सुरक्षेसाठी निवासस्थानी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना भेटला, पण त्याला भेटू दिले नाही. त्यानंतर तो दोन तास याच परिसरात फिरत होता. शेवटी मी खुनातील आरोपी आहे असे म्हटल्यावर त्याला आयुक्तांशी भेटता आले.
 
काय होते प्रकरण : भावसिंगपुरायेथील शेख अल्ताफ ऊर्फ पीटर या तरुणाचा खून केल्याचा आरोप मुकेशवर आहे. त्याच्यासोबतच्या इतर चार आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. ते न्यायालयीन कोठडीत आहेत. २० मार्च २०१६ रोजी अल्ताफ याला भावसिंगपुऱ्यातून या आरोपींनी गाडीत बसवले होते. ते अल्ताफच्या भावाच्या मित्राने पाहिले होते. दरम्यान या गाडीतील लोकांनी अल्ताफला कासंबरी दर्ग्याच्या परिसरात नेऊन लाकडी दांड्याने मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह जळगाव नजीकच्या पहूरपेठ भागातील एका बंद धाब्याच्या हौदात टाकून दिला होता. अल्ताफच्या आईने तो बेपत्ता झाल्याची तक्रार छावणी ठाण्यात दिली होती. पोलिसांच्या तपासात आरोपी निष्पन्न झाले. मुकेशला भीमनगर भावसिंगपुऱ्याच्या कमानीजवळ अटक केले होते. तो प्लाॅटिंगचा दलाला आहे. त्याने पत्नीला भीमनगर भावसिंगपुरा वाॅर्डातून राष्ट्रवादी पक्षाकडून मनपाच्या निवडणुकीत उभे केले होते. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत तपास करत आहेत.
 
साहेब, तुम्हाला खरे सांगायचे होते म्हणून...
आरोपीमुकेश आयुक्तांना भेटून म्हणाला, साहेब मी खून केलेला नाही. नेमके हेच सांगण्यासाठी घाटीतून पळून गेलो होतो. कारण मला माहीत आहे, तुम्हीच मला न्याय देऊ शकाल म्हणून.
बातम्या आणखी आहेत...