आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बेदरकार वाहने चालवणाऱ्या 178 चालकांवर कारवाई, दंडासह समज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - बेदरकारपणे गाडी चालवून दुसऱ्यांचा बळी घेणाऱ्या, कायमस्वरूपी जायबंदी करणाऱ्यांवर पोलिस कधी कारवाई करणार, असा सवाल दिव्य मराठीने हाती घेतलेल्या अभियानाद्वारे उपस्थित केला होता. त्याची दखल घेऊन पोलिसांनी मंगळवारी (२८ नोव्हेंबर) १७८ वाहनचालकांवर कारवाई केली. कडक शब्दांत समज देऊन त्यांच्याकडून दंड वसूल केला. ही मोहीम सुरूच राहील, असे उपायुक्त डॉ. दीपाली धाटे - घाडगे यांनी सांगितले. मात्र, अशा बेदरकार वाहनचालकांचा कायम बंदोबस्त करण्यासाठी ते धुमाकूळ घालत असलेल्या रस्त्यांवर सीसीटीव्ही, स्पीडगन लावणे आवश्यक असल्याची दिव्य मराठीची भूमिका आहे. 

 

शहरातील विविध महाविद्यालयाचे परिसर, बाजारपेठा या भागांत बेफाम, बेदरकार वाहनचालकांचा धुमाकूळ सुरू आहे. त्यांनी गेल्या आठवड्यात बीड बायपासवर एकाचा बळी घेतला. उल्कानगरीत मनपाच्या एका निवृत्त उपअभियंत्याला गंभीर जखमी केले. एमजीएमजवळ चौघांना उडवले. त्यामुळे दिव्य मराठीने अभियान हाती घेतले. त्यास जागरूक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मात्र, पोलिसांकडून कारवाई झाली नव्हती. त्यामुळे किती बळी गेल्यावर पोलिस कारवाई करणार, असा सवाल उपस्थित केला. त्याची दखल घेण्यात आली. 

 

असेही आवाहन 
प्रत्येकचौकात पोलिसांनी थांबणे शक्य नाही. त्यामुळे त्या भागातील नागरिकांनी व्यापाऱ्यांच्या पुढाकार घेऊन सीसीटीव्ही लावावेत आणि जालना रोडसारख्या मोठ्या वर्दळीच्या रस्त्यावर स्पीडगनचा वापर करावा, अशी भूमिका दिव्य मराठीनेे घेतली आहे. 

 

बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्यांची माहिती द्या : बेदरकारपणे चारचाकी चालवणाऱ्यांकडे वाहतूक पोलिस दुर्लक्ष करतात. उगीच झेंगट नको, अशी त्यांची भूमिका असते. अशा वाहनचालकांची माहिती तुम्ही दिव्य मराठीला ९९२२९९४३२६ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर देऊ शकता. ती प्रसिद्ध करण्यात येईल पोलिसांनाही देण्यात येईल. 

 

रिक्षाचालकांना शिस्त लावणेही महत्त्वाचे 

बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्या वाहनचालकांची माहिती देण्याचे आवाहन दिव्य मराठीकडून करण्यात आले होते. तेव्हा शहरातील अनेक नागरिकांनी रिक्षाचालकांच्या बेदरकारपणाच्या तक्रारी केल्या आणि जालना रोड, जळगाव रोड, रेल्वेस्टेशन, बाबा पेट्रोलपंप, बसस्थानक या मोक्याच्या ठिकाणी रिक्षाचालकांना शिस्त लावावी, अशा सूचनाही केल्या आहेत. 

 

पाचशे ते एक हजार रुपयांपर्यंत दंड 
डॉ. धाटे-घाडगे यांनी सांगितले की, बेदरकारपणे गाडी चालणाऱ्यांच्या विरोधात मोहीम सुरूच राहणार. मंगळवारी ड्रंक अँड ड्राइव्हच्या केसेस केल्या जात असून यात न्यायालयात किमान दोन हजार रुपये दंड आकारला जातो. याशिवाय कलम १८४ नुसार कारवाई केली. त्यात ५०० ते 1 हजार रुपये दंड आकारण्यात आला. तर २७९ कलमान्वये झालेल्या कारवाईत न्यायालयाची पावती देण्यात आली. 

बातम्या आणखी आहेत...