आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोदावरी नदीपात्रातील वाळूपट्ट्यात कारवाई, वाळू उपसा करण्याचे साहित्य जप्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - मागील सहा महिन्यांपासून पैठणच्या गोदावरी नदीपात्रातून बेसुमार अवैध वाळूचा उपसा सुरू आहे. औरंगाबादमधील काही पोलिस अधिकारी व महसूल विभागाच्या काही अधिकाऱ्यांचे हायवा ट्रक वाळू वाहतूक करत असल्याची बाब समोर आली. प्रभारी तहसीलदार व पोलिस अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याच्या विभागीय आयुक्तांकडे तक्रारी झाल्यानंतर पैठणचे प्रभारी तहसीलदार सी. डी. मेंडके यांच्या पथकाने नदीपात्रात एक-दोन ठिकाणांहून वाळू उपसा करण्याचे साहित्य जप्त केले.
 
मागील सहा  महिन्यांपासून महसूलचे प्रभारी राज असल्याने रोज लाखो रुपयांचा वाळू उपसा होत आहे. यासंदर्भात पर्यावरणप्रेमींकडून ओरड होत असल्याने तहसीलदार मेंडके यांच्या विशेष पथकाने थेट नदीपात्रात जाऊन कारवाई केली. परंतु  ज्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा होतो त्याकडे न फिरकता जेथे कमी वाळू उपसा होतो तेथील  वाळू उपसा करण्याचे साहित्य जप्त केले.
 
आपेगाव, वाघडी, नवगाव, आवडे उंचेगाव येथील काही वाळू तस्करांचे ट्रॅक्टर वाळू उपसा करण्यासाठी लावलेले आहेत, हे ट्रॅक्टर दिवसा वाळू उपसा करतात व  हायवातून  रात्री वाळू वाहतूक केली जाते. मात्र, तहसीलदार मेंडके यांच्या पथकाला ना ट्रॅक्टर आढळला ना  हायवा ट्रक. यावरून पथकाच्या या कारवाईवर शंका उपस्थित होत आहे.  सहा महिन्यांपासून तहसीलचे वाळूविरोधी पथक नावालाच होते. आज  या पथकाने वाळू उपशाचे साहित्य जप्त केले. पंचनामे झाल्यावर कारवाई करण्यात येईल, असे तहसीलदार मेंडके यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...