आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Activities In Senduravada Zilla Parishad Schools

"लेक कशानं ती उणी, राजस बाई माझी हिरा नव्हे हिरकणी'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- "लेकागं परीस! लेक कशानं ती उणी, राजस बाई माझी हिरा नव्हे हिरकणी' अशा शब्दांत जात्यावरच्या ओव्यांमधून मुलगी ही मुलांपेक्षा कुठेच कमी नाही, असे सांगितले जायचे, परंतु ग्रामीण भागात स्त्री भ्रूणहत्या थांबाव्या, मुलीच्या जन्माचे स्वागत व्हावे यासाठी गंगापूर तालुक्यातील शेंदुरवादा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, अंगणवाडी शिक्षिका २०११ पासून जनजागृती मोहीम राबवत आहेत. मुलीला जन्म देणाऱ्या माता-पित्यांची मुलीसह बैलगाडीतून मिरवणूक काढली जाते. शाळेतील शिक्षक शासनाच्या मदतीशिवाय मुलीच्या उच्चशिक्षणासाठी पाठपुरावा करत आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील शेंदुरवादा हे गाव. शहरापासून अवघ्या २५ ते ३० किलोमीटर अंतरावर आहे. ग्रामीण भागात स्त्री भ्रूणहत्या थांबावी तसेच तिच्या जन्माचे स्वागत व्हावे यासाठी शेंदुरवादा गावातील जिल्हा परिषदेतील शाळेच्या शिक्षकांनी समाज सहभागातून "स्वागत तिच्या जन्माचे' या उपक्रमाची २०११ मध्ये सुरुवात केली. मुली या मुलांपेक्षा कमी नाहीत. त्यांच्या पंखांना बळ द्या, मुलगा आणि मुलीत भेद करता दोघांनाही समान शिक्षण द्या, असा संदेश दिला जातो. तसेच शाळेच्या वतीने ज्या घरी मुलगी जन्मली त्या पालकांचा सत्कार केला जातो. आतापर्यंत १५ हून अधिक पालकांचा सत्कार करण्यात आला आहे. शाळेचे मुख्याध्यापक एस. टी. मराठे म्हणाले की, सुरुवातीला सत्कारात सहभागी होणारा पालक वर्ग आता स्वत:हून पुढे येते आहे.

सामनतेचीअशीही शिकवण :
मुलींच्याजन्माचे स्वागत करणे अथवा समान वागणूक देणे, या बाबी करण्यापुरता हा उपक्रम थांबलेला नाही, तर मुलांमध्येही मुलींबद्दल आदर असावा. एक माणूस म्हणून एकमेकांप्रति वर्तन असावे. या उद्देशाने वर्गात एक मुलगा आणि एक मुलगी अशा पद्धतीने बाकावर बसवण्यात येते.
पुढाकार हवाच
शिक्षक म्हणून ज्ञानदानाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणेदेखील सर्वांची जबाबदारी आहे. वाढती स्त्री भ्रूणहत्या हा िचंतेचा विषय आहे. त्यामुळेच आम्ही या उपक्रमाची सुरुवात गावाच्या सर्वेक्षणानंतर केली. आज गावातील मुलामुलींची संख्या समानतेवर येत आहे. एस.टी. मराठे, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक
असा आहे शाळेचा उपक्रम
शाळेच्यावतीने मुलगी जन्माला आल्यानंतर पालकांचा सत्कार केला जातो. त्या दिवशी मुलींना प्रोत्साहन मिळावे म्हणून शाळेतील मुलींची बैलगाडीतून वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. तसेच मुलीची काळजी घेणे, तिचे पालनपोषण आणि ती नियमित शाळेत येते की नाही, याकडे अंगणवाडी सेविकांच्या मदतीने लक्ष ठेवले जाते. समाज सहभागातून हा उपक्रम राबवला जातो. या उपक्रमात गावातील मंडळींसह एकूण पंधरा सदस्य काम करत आहेत.