आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actor Ashutosh Rana Say , Good Author And Audience In Maharashtra

अभिनेता आशुतोष राणा म्हणतो, महाराष्ट्रात उत्तम साहित्यिक आणि रसिकही!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता आशुतोष राणाने मांडले अभिनयाचे विविध अंग; दै. ‘दिव्य मराठी’ कार्यालयाला दिली सदिच्छा भेट
1994 मध्ये महेश भट्ट यांच्या ‘स्वाभिमान’ मालिकेतील ‘त्यागी’ या पहिल्याच भूमिकेतून सर्वांचे लक्ष वेधणारा अभिनेता आशुतोष राणा पुढे ‘दुश्मन’ आणि ‘संघर्ष’सारख्या चित्रपटांतून दज्रेदार आणि प्रभावी खलनायकाच्या भूमिकेत दमदारपणे उभा राहिला. अतिशय चोखंदळपणे भूमिका निवडणारा आणि तितक्याच ताकदीने ती सर्वांपुढे मांडणार्‍या आशुतोषने मंगळवारी (16 एप्रिल) दै. ‘दिव्य मराठी’ कार्यालयाला भेट दिली. या वेळी अभिनय क्षेत्रातील प्रवासाबद्दल त्याने दिलखुलासपणे मत मांडले. ते त्याच्याच शब्दांत..
निराकाराला साकार करण्याची क्षमता म्हणजे ‘कला’ आहे. प्रत्येक अभिनेता त्याच्या कलेमुळे जाणला जातो. माझ्या नकारात्मक भूमिका जास्त लक्षात राहिल्या, कारण मी नकारात्मक भूमिकाही सकारात्मकरीत्या सादर केल्या. महाराष्ट्रात उत्तम साहित्यिक आणि रसिकही आहेत. गेल्या 10 वर्षांच्या काळात मी विविध चित्रपटांतून भूमिका केल्या. प्रत्येक भूमिकेचा पैलू वेगळा होता म्हणूनच त्या लक्षात राहिल्या.

भारतीय अभिनेता म्हणणे आवडेल : आजवरच्या कामामुळे मी समाधानी आहे. भूमिका बॉक्स ऑफीसवर किती यशस्वी होते यापेक्षा संतुष्टी मिळणे महत्त्वाचे आहे. एखाद्या विशिष्ट भाषेतील चित्रपटांमध्ये भूमिका करून त्या-त्या भाषेचा अभिनेता म्हणून नाव कमवायचे नाही तर भारतीय अभिनेता म्हणून नावलौकिक मिळवायचे आहे. यासाठी मी हिंदी, तमिळ, तेलुगू, हरियाणवी, भोजपुरी अशा विविध भाषांतून भूमिका केल्या आहेत.

कलाकार, अदाकारमध्ये अंतर आहे
कलाकार प्रत्येक भूमिकेत वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न करतो. अदाकार हा कला सादर करतो मग ती त्याची स्टाइल बनते, पण कलाकार आपल्या प्रत्येक भूमिकेत नवी स्टाइल देतो. मी हिंदीतील नवा खलनायक म्हणून उंचीवर पोहोचत असतानाच तेलुगूकडे वळलो याचे कारण आधी केलेल्या भूमिकांपेक्षा अधिक ताकदीची भूमिका करायची असा माझा मानस होता. आपले रेकॉर्ड आपणच मोडायचे मात्र तशी भूमिका आली नाही. तोच तो पणा किंवा कमी ताकदीच्या भूमिका करायच्या नाहीत हा निर्णय मी घेतला .

साधना महत्त्वाची : कोणत्याही क्षेत्रात काम करा, आपली साधनाच अधिक महत्त्वाची आहे. ज्याच्याकडे र्मसिडीज तो चांगला अभिनेता असे हल्ली समीकरण आहे. प्रत्यक्षात चांगला अभिनेता असल्याने माझ्याकडे र्मसिडिज आहे, याला महत्त्व देणे गरजेचे आहे.