आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Actor Ritesh Deshmukh,Latest New In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रितेशने अनुभवला स्वत:च्या जल्लोषाचा सोहळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- बॉलीवूडचा सुपरस्टार आणि मराठवाड्याचा सुपुत्र अभिनेता रितेश देशमुख ‘लई भारी’ या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सायंकाळी 5 वाजता प्रोझोन मॉलमध्ये येणार हे कळताच चाहत्यांनी दुपारी 3.30 वाजेपासूनच मॉलमध्ये गर्दी केली. लाडक्या अभिनेत्याला एक नजर पाहण्यासाठी ‘प्रोझोन’चे तिन्ही जिने आणि फूडकोर्ट चाहत्यांनी तुडुंब भरले होते. स्वत:च्या जल्लोषाचा असा ओथंबलेला सोहळा पाहून रितेशही भारावून गेला आणि उद्गारला, माझ्यावर प्रेम करताय ना? मग लई भारी बघा!
रितेशची प्रतीक्षा करत असलेल्या तरुणांनी त्याच्या नावाने एकच जल्लोष केला. मोठ्या स्क्रीनवर ‘लई भारी’चे प्रोमो झळकत होते, ‘माउली माउली’ गाणे सुरू होताच आणि स्क्रीनवर रितेश दिसू लागताच चाहत्यांचा आवाज आसमंताला भिडला. मॉलमधील मुख्य स्क्रीनसमोर रितेश येऊन उभा राहिल्यानंतर तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले.
त्यांना आवरणेही कठीण झाले होते. पोलिसांचा फौजफाटा अन् बाउन्सर्सची फळी चाहत्यांच्या रेट्याला थोपवून धरत होती. मात्र, हजारोंच्या संख्येने एकवटलेल्या गर्दीला थोपवणे सोपे नव्हते. तरुणांप्रमाणेच तरुणीही मोठ्या संख्येने प्रोझोन मॉलमध्ये उपस्थित होत्या. रितेश येताच तरुणींनी त्याला आवाज देण्यास सुरुवात केली. रितेशने स्वत:च्या मोबाइलमध्ये स्क्रीनवरील स्वत:चेच चित्र टिपले. दरम्यान, आपल्या लाडक्या अभिनेत्याला पाहण्यासाठी आलेले तीन तरुण जिन्यावरून खाली पडल्याने किरकोळ जखमी झाले.