आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोल्ड भूमिका करणे साधी गोष्ट नाही : प्रार्थना बेहरे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुठल्याही अभिनेत्रीसाठी बोल्ड भूमिका करणे सोपे नसते. अशावेळी प्रचंड दडपण येते. मात्र, दमदार अभिनयासाठी अशी आव्हानेही स्वीकारावी लागतात. आगामी कारकीर्दीतही अशी आव्हाने माझ्यापुढे आल्यास निर्णय घेणे कठीण आहे. विद्या बालन आणि सई ताम्हणकर यांना त्यांच्या बोल्ड भूमिकांसाठी मानावे लागेल, असे मत नवोदित अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने व्यक्त केले. अत्यंत गोड चेहरा आणि बोलके डोळे असलेली ही अभिनेत्री. बोलका स्वभाव आणि सर्वांत मिसळणारी असल्याने ती इतर नवोदितांपेक्षा वेगळी वाटते. अवधूत गुप्ते दिग्दर्शित ‘जय महाराष्ट्र, ढाबा बठिंडा’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी औरंगाबादेत आली असताना ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधी रोशनी शिंपी यांनी तिच्याशी केलेला संवाद तिच्याच शब्दांत.

मी मूळची बडोद्याची. तिथेच वाढले. त्यामुळे उत्तम गुजराती बोलते. मी मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. बीएस्सी स्टॅटेस्टिकचे शिक्षण घेतले. लहानपणापासूनच भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेतले. अभिनयाची आवड होती. लहानपणी सगळ्यांना वाटते तसेच मलाही अभिनेत्री व्हावेसे वाटत होते. मात्र, यासाठीचा मार्ग माहिती नव्हता. शिवाय मोठे होताना ही इच्छा मनाच्या कोपर्‍यातच लुप्त झाली. मास कॉमचे प्रशिक्षण घेण्यासाठी मुंबईत आले. स्टार न्यूजवर ‘पेज 3’ रिपोर्टिंग करायचे. अनेक चित्रपटांचे, नाटकांचे प्रिव्ह्यू, रिव्ह्यू आणि पडद्यामागच्या घडामोडी टिपताना या क्षेत्रात काम करण्याची माझी इच्छा पुन्हा एकदा बुलंद झाली. नोकरी सोडून मग रेणुका शहाणे यांच्या रिटा चित्रपटासाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले. याच दरम्यान छोट्या पडद्यावरील ‘पवित्र रिश्ता’ मालिकेद्वारे वैशालीच्या भूमिकेत पुढे आले. सुरुवातीला मी ही भूमिका करणार नव्हते. मात्र, अभिनयाचा प्रत्यक्ष अनुभव मिळवण्यासाठी ती भूमिका केली. यानंतर अवधूतजींच्या या चित्रपटाची संधी चालून आली. पेज 3 पत्रकार ते अभिनेत्री असा माझा प्रवास आहे.

चित्रपटांची चंदेरी दुनिया पत्रकार म्हणून मी खूप जवळून पाहिली आहे. हिंदी सिनेमातील र्शीदेवी, माधुरी दीक्षित, करिना कपूर आणि विद्या बालन माझ्या आवडत्या अभिनेत्री आहेत. तसेच मराठीतील सोनाली, अमृता आणि सई मला आवडतात. बोल्ड भूमिका करताना प्रचंड दडपण येत असते. यामुळे सई आणि विद्या यांनी पेललेल्या आव्हानांबद्दल मला आदर आहे. सर्वांना भावेल आणि समाधान देतील अशा भूमिका करण्याची इच्छा आहे.

जुन्या सवंगड्यांना कधीच विसरणार नाही
अभिनेत्री बनले तरीही आपण ज्या ठिकाणाहून आलो, ज्यांच्यासोबत वाढलो, खेळलो त्या लोकांना मी कधीच विसरणार नाही, हे माझ्या आयुष्याचे तत्त्व आहे. आपल्या जडणघडणीत कळत नकळत आपल्या अशाच मित्र, मैत्रिणींचे व आप्तेष्टांचे योगदान असते, हे मी मानते. त्यामुळे कुठेही पोहोचले तरी त्यांची साथ सोडणार नाही.