औरंगाबाद - ‘आदर्श’ घोटाळ्याची पोलखोल करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या चौकशीतच 7 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. पदाधिका-यांच्या मराठवाडा विभागीय मेळाव्यासाठी ते औरंगाबाद शहरात आले होते.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, चौकशी समिती हा एक फार्स होता. घोटाळे करणारे तेच, चौकशी करणारे न्यायाधीशही तेच अन् अहवाल फेटाळणारेही तेच, असे चित्र आहे. अहवाल फेटाळायचाच होता, तर चौकशी केली कशाला? या चौकशीसाठी 7 कोटी रुपयांचा खर्च झाला असून हाच एक घोटाळा आहे. त्यामुळे सरकारने राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जाणे हाच पर्याय असल्याचेही त्यांनी सांगितले.
सीएम हे मिस्टर क्लीन कसे?
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिमा मिस्टर क्लीन अशी असली, तरी ते प्रत्येक घोटाळ्यावर पांघरूण घालतात. तेव्हा ते मि. क्लीन कसे, असा सवाल त्यांनी केला. ते स्वत: मि. क्लीन असले, तरी सरकार चालवणारे कोण, हे तरी जनतेला कळू द्यावे. तिकडे राहुल गांधी आधी मनमोहनसिंग आणि नंतर चव्हाणांवर ताशेरे ओढतात; पण त्याने साध्य काय होणार, असा सवालही त्यांनी केला. या वेळी खासदार चंद्रकांत खैरे, मराठवाड्यातील पक्षाचे सर्व आमदार, सर्व जिल्हाप्रमुख, महापौर कला ओझा यांच्यासह पालिकेचे पदाधिकारीही उपस्थित होते.
दुधगावकर नॉट रिचेबल
औरंगाबाद आणि परभणी लोकसभा मतदारसंघांतील कार्यकर्त्यांशी उद्धव ठाकरे चर्चा करणार होते. मात्र, परभणीचे खासदार गणेश दुधगावकर यांना उमेदवारी देणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने ते या मेळाव्याकडे फिरकलेच नाहीत. ते का आले नाहीत? अशी विचारणा ठाकरे यांच्याकडे केली असता प्रथम त्यांनी बोलण्यास नकार दिला. खोदून विचारले असता ते नंतर येणार आहेत, असा खुलासा त्यांनी केला. दुधगावकर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते नॉट रिचेबल होते. दुधगावकर आता शिवसेनेसाठी कायमचे नॉट रिचेबल झाल्याचे पक्ष सूत्रांकडून सांगण्यात आले. दुसरीकडे कन्नडचे मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव या वेळी उद्धव यांच्या समवेत होते.