आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदर्श शिक्षक पुरस्कार पाच सप्टेंबरला नाहीच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणार्‍या आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण गेल्या दोन वर्षांपासून करण्यात आले नाही. यंदाही पाच सप्टेंबरला हा पुरस्कार दिला जाणार नसल्याचे संकेत मिळाले आहेत. पाच सप्टेंबरला पुरस्कार देण्याबाबत प्रशासनाकडूनच अडचण निर्माण केली जात असल्याचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विजया चिकटगावकर यांनी सांगितले. तर नियमानुसार प्रक्रिया सुरू असल्याने पुरस्काराला विलंब लागत असल्याचे शिक्षणाधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांना देण्यात येणारी वेतनवाढ शासनाने बंद केली आहे. त्यात जिल्हा परिषद प्रशासनाकडून वेळेवर पुरस्काराचे वितरण करण्यात येत नसल्याने तीन वर्षांत 36 प्रस्ताव जि. प. ला प्राप्त झाले आहेत. या पुरस्कारासाठी शिक्षकांची निवडही प्रशासन, अध्यक्ष, शिक्षण सभापतींनी केली आहे. तिन्ही वर्षांचे पुरस्कार एकदाच देण्यात येणार असले तरी पाच सप्टेंबर रोजी हा पुरस्कार मिळणार नसल्याचे अध्यक्षा आणि शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. 17 सप्टेंबर हा मुहूर्त अध्यक्षांकडून काढण्यात आला असला तरी त्या दिवशीही हा पुरस्कार देणे अशक्य असल्याचे संकेत मिळत आहेत.

5 व 17 सप्टेंबरला पुरस्कार देण्यात काय अडचण?
पाच सप्टेंबरला शिक्षक दिन असून त्या दिवशी हा पुरस्कार देणे अपेक्षित आहे. मात्र या दिवशी पुरस्काराचे वितरण होणार नाही. 19 तारखेला प्रशासनाने यादी तयार करून शिक्षण सभापती आणि अध्यक्षांच्या स्वाक्षरीसाठी दिली होती. 29 ऑगस्ट रोजी यादी मंजुरीसह शिक्षण विभागाला दिली. शिक्षण विभागाने ती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठवली आहे. आलेल्या प्रस्तावांची पडताळणी करून अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

हा पुरस्कार पाच सप्टेंबरलाच द्यावा यासाठी पदाधिकारी तयार आहेत. मात्र प्रशासनाकडूनच हा पुरस्कार देण्यात अडचण येत असल्याचे सांगण्यात येत आहे अशी माहिती प्रभारी जिल्हा परिषद अध्यक्षा विजया चिकटगावकर यांनी दिली.

पदाधिकार्‍यांना 19 तारखेला यादी तयार करून दिली होती. त्यांनी 30 ऑगस्ट रोजी मंजूर केली, अशी माहिती शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांनी दिली.