आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Adity Thackeray Finished His Aurangabad Tour Within Minutes

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आदित्य ठाकरेंची दशपावली, कार्यकर्त्यांच्या गराड्यामुळे थोडक्यातच आटोपली रस्त्याची पाहणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदिराबाई पाठक महाविद्यालयातील कार्यक्रमानंतर आदित्य ठाकरे यांना तरुणींनी गराडा घातला. छाया : रवी खंडाळकर
औरंगाबाद - युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांना शहरातील विकासकामांना भेटी द्यायला लावून मनपा निवडणुकीच्या दृष्टीने अघोषित प्रचाराचा श्रीगणेशा करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न औपचारिकतेपुरताच राहिला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव असलेल्या क्रांती चौक ते रेल्वेस्टेशन रस्त्याची अवघ्या दहा मिनिटांत पाहणी करून ठाकरे कन्नडच्या दिशेने रवानाही झाले. रस्ता बघण्यासाठी उतरलेल्या ठाकरे यांना कार्यकर्त्यांनी असा काही गराडा घातला की दहा पावले चालून त्यांनी मला रस्ता तर बघू द्या, अशी विनंती करावी लागली. शेवटी चालत्या गाडीतूनच त्यांनी या कामाची पाहणी केली.

कन्नड येथे आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबांची भेट, शरणापूर रस्त्याच्या कामाचे उद्घाटन, महिला महाविद्यालयाच्या दोन वर्गखोल्यांचे उद्घाटन, कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन व या रस्त्याची पाहणी या भरगच्च कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरे यांचे दुपारी १२ वाजेच्या सुमारास औरंगाबादेत आगमन झाले. शिवसेनेच्या स्थानिक पुढा-यांनी ठाकरे यांना आधी एसबीआय चौक ते मध्यवर्ती जकात नाका हा रस्ता दाखवण्याचीही तयारी केली होती, पण वेळेअभावी ते रद्द करण्यात आले. ते थेट क्रांती चौकात आले. तेथे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. रस्त्याची पाहणी करण्यासाठी खाली उतरलेल्या ठाकरे यांना कार्यकर्ते, नेत्यांनी गराडा घातला होता. या गर्दीत त्यांना चालणेही अवघड बनले. ठाकरे निघाले की हा घोळकाही पुढे सरकला. यामुळे मला रस्ता तर दिसू द्या, असे ठाकरे म्हणाले. तरीही गर्दी हटेना. तेव्हा गाडीमध्ये जाण्याचा आदेश ठाकरे यांनी सोडताच गाडी बोलावण्यासाठी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह महापौर कला ओझा, राजू वैद्य यांची काही क्षणासाठी धावपळ उडाली. मात्र गाड्या पाठीमागेच असल्याने तत्काळ गाडी उपलब्ध झाली. गाडीत बसून थेट रेल्वेस्टेशनला निघाले. कुठेच थांबायचे नाही, असे आदेश खैरे यांनी पोलिस यंत्रणेला दिले.
गोपाल टी चौकात काही कार्यकर्ते उभे होते. त्यांनी गाड्यांचा रोख लक्षात घेऊन रस्त्याच्या बाजूला फटाक्यांची आतषबाजी केली. त्यामुळे काही क्षणासाठी थांबून थेट रेल्वेस्टेशनकडे ताफा गेला. रेल्वेस्टेशनजवळ कार्यकर्त्यांना भेटता येईल या अपेक्षेने कार्यकर्ते ताफ्याचा पाठलाग करत होते. मात्र रेल्वेस्टेशनला न थांबता बाबा पेट्रोल पंपमार्गे शरणापूरकडे सर्व ताफा सुसाट निघून गेला. कार्यकर्ते निराश होऊन परतले. ठाकरे यांना रस्त्याबाबत माहिती देण्यासाठी खास टिप्पणी तयार करण्यात आली होती. मनपाचे अधिकारी टिप्पणीच्या प्रती व फायलींचे गठ्ठे घेऊन तेथे आले होते. पण त्यांच्याशीही त्यांचा संवाद झाला नाही.

या वेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री तथा पर्यावरणमंत्री रामदास कदम, माजी आमदार प्रदीप जैस्वाल, अंबादास दानवे, सुहास दाशरथे, किशोर नागरे, बाळासाहेब थोरात, राजेंद्र जंजाळ, ऋषिकेश खैरे, किरण तुपे, इंदरजितसिंग बिंद्रा आदींची उपस्थिती होती.
पुढे वाचा कुस्तीचे उद्घाटन टाळले...