आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO : शिवाजीनगर ते समर्थनगर आदित्य ठाकरेंना पाहण्यासाठी युवकांची गर्दी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महापालिका निवडणुकीला अवघे चार दिवस बाकी असताना प्रचाराला आता कुठे रंग चढत आहे. ओवेसी रामदास कदम यांच्या सभांनंतर आज युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या रोड शोने शहरात निवडणुकीचे वातावरण दिसले. शिवाजीनगर ते समर्थनगर असा हा रोड शो होता.
महापालिका निवडणूक २२ तारखेला असली तरी संपूर्ण शहरात निवडणुकीचे वातावरण फारसे जाणवत नव्हते. वॉर्डांपुरती दिसणारी निवडणुकीची धूम संपूर्ण शहरात पाहायला मिळाली नाही. गुरुवारी रामदास कदम असदुद्दीन ओवेसी यांच्या सभांनंतर शहरभर निवडणूक जाणवू लागली आहे. शुक्रवारी आदित्य ठाकरे यांच्या रोड शोने या वातावरणात भरच घातली.
शिवाजीनगरपासून ठाकरे यांच्या या रोड शोला प्रारंभ झाला. ठाकरे यांच्यासोबत पालकमंत्री रामदास कदम, आदेश बांदेकर, खासदार चंद्रकांत खैरे, विनोद घोसाळकर, आमदार संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, उमेदवार राजेंद्र जंजाळ, दिग्विजय शेरखाने उघड्या जीपवर स्वार झाले. चारचाकी दुचाकींच्या गर्दीमुळे शिवाजीनगरचा मुख्य रस्ता तुंबला गेला.
रोड शो पाहण्यासाठी खासकरून तरुणांनी प्रचंड गर्दी केली होती. शिवाय स्मार्टफोनमध्ये फोटो खेचण्यासाठीही सगळ्यांची लगबग सुरू होती. रोड शो सुरू होताच काही मिनिटांनीच रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या महिला ज्येष्ठ नागरिकांना भेटण्यासाठी ठाकरे गाडीतून खाली उतरले. त्यांनी या सर्वांची चौकशी करीत अभिवादन केले.
शिवाजीनगरच्या चौकातून सूतगिरणी चौकात येईपर्यंत हा प्रकार जागोजाग सुरू होता. नंतर रिलायन्स मॉलजवळ नागरिकांनी कार्यकर्त्यांनी ठाकरे यांचे स्वागत केले. ते स्वीकारून हा ताफा हिंदुराष्ट्र चौक मार्गे पुंडलिकनगर, जयभवानीनगर चौक, सिडको एन-५ ते क्रांती चौक मार्गे समर्थनगरपर्यंत पोहोचला. या रोड शोद मध्ये जवळपास २०० दुचाकी सहभागी झाल्या होत्या.
एमआयएमला धूळ चारू

पत्रकारांशी संवाद साधताना ठाकरे म्हणाले की, एमआयएमच्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी शिवसेना समर्थ आहे. युती एमआयएमला नक्कीच धूळ चारेल. एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी युती झालेली असल्याने जागा निश्चितच वाढतील, असा विश्वास व्यक्त केला. समांतर जलवाहिनी लवकरच पूर्ण करू, असेही ते म्हणाले.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा आदित्य ठाकरे यांच्या रोड शोची काही छायाचित्रे...