आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदिवासी विद्यार्थ्यांसह पालकही गिरवताहेत साक्षरतेचे धडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खंडाळा - येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी आदिवासी वस्तीवर शिक्षणाचा पायंडा पाडला आहे. विद्यार्थ्यांसह पालकांना शिक्षण, संस्कृती व स्वच्छतेचे धडे देऊन त्यांच्या जीवनात क्रांती घडवण्याची किमया केली आहे. तुकारामवाडीवरील शिक्षित, सुसंस्कृत व स्वच्छतेचे धडे गिरवणारे आदिवासी कुटुंबीयांना भेट देण्यासाठी तालुक्यातील नागरिक कौतुकाने येथे येतात. वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावापासून पाच किलोमीटर अंतरावर डोंगरी भागात तुकारामवाडी वस्ती आहे.


वस्तीवर प्रामुख्याने आदिवासींची सुमारे 115 कुटुंबीयांची घरे असून त्यांची लोकसंख्या तीनशेवर आहे. डोंगराळ भागात असल्याने येथे शिक्षणाचा गंध नव्हता. येथील प्रमुख व्यवसाय म्हणजे मासेमारी, मोलमजुरी व पशुपालन होय. वस्तीवर 2001 मध्ये वस्तीशाळा सुरू झाली होती.


वस्तीशाळेतील शिक्षकांनी शिक्षणापासून कोसो दूर असलेल्या आदिवासींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सात वर्षे संघर्ष केला. तेव्हा वस्तीशाळा झाडाखाली भरवून आदिवासी मुलांना शिक्षणाकडे आकर्षित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सुरू झाले. 2008 नंतर आदिवासी मुलांची शिक्षणासाठी वाढती गोडी व संख्या पाहून वस्तीशाळेचे रूपांतर जिल्हा परिषद शाळेत झाले. येथे पहिली ते चौथीचे वर्ग सुरू झाले अन् येथून पुढे गुणवंत व दर्जेदार विद्यार्थी घडवण्याचे खरे काम सुरू झाले. या शाळेत एक मुख्याध्यापक व एक शिक्षक असून त्यांनी याच वस्तीवर राहून विद्यार्थ्यांबरोबर आदिवासी बांधवांनाही समाजात कसे राहावे, राहणीमान व संस्काराचे शिक्षण देऊन त्यांनाही समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले.


विद्यार्थ्यांसोबत पालकांना शिक्षणाची व स्वच्छतेची गोडी लागावी म्हणून आम्ही तीन वर्षांपासून पालकांची शाळा भरवतो. आदर्श आदिवासी वस्ती म्हणून लोक येथे भेट देतात.
आर.व्ही. लोहारे, मुख्याध्यापक


दर आठवड्याला पालकांच्या शाळेमुळे बांधवांमध्ये शिक्षणाची व इतर चांगल्या गोष्टींची गोडी लागली. विचारांचे महत्त्व पटले. सरांनी सांगितलेले उपक्रम आम्ही नित्याने राबवतो.
भास्कर मोरे, आदिवासी,


दर आठवड्याला पालकांची शाळा
वस्तीशाळेवरील दोन्ही शिक्षकांनी तीन वर्षांपासून दर आठवड्याला पालकांची शाळा वस्तीवर सुरू केली. यात पालकांना मुलांची स्वच्छता, संगोपन, परिसर स्वच्छतेचे धडे व मुलांना चांगल्या सवयी या गोष्टींचे मार्गदर्शन केले जाते. दैनंदिन व्यवहारातील गणिते व चांगले उपक्रम राबवण्याचे कार्य सुरू आहे.


पाचशे झाडे लावली
आदिवासी बांधवांनी शाळा परिसरात पावसाळ्यात पाचशे झाडांची लागवड केली. आज ते स्वत: रोपट्यांचे संगोपन करतात.