आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौर निवडणुकीसाठी प्रशासनाची जोरात तयारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नवीन महापौरपदासाठी २९ एप्रिल रोजी निवडणूक होत असून त्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. दरम्यान, ही निवडणूक वादग्रस्त ठरण्याची शक्यता असल्याने कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे.
महापौर निवडणुकीसाठी नगरसचिव कार्यालयाचे काम २३ तारखेलाच सुरू झाले आहे. या निवडणुकीचा अजेंडा २३ तारखेलाच नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांना देण्यात आला आहे. २९ ला होणाऱ्या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी विक्रमकुमार हे पीठासन अधिकारी राहणार असून ते ही निवडणुकीची प्रक्रिया हाताळणार आहेत. हात उंचावून महापौर निवडला जाणार असून ते मोजण्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ असणार आहे. याशिवाय ही निवडणूक प्रक्रिया हाताळण्यासाठी नगरसचिव कार्यालयाचा ताफा व मनपाचे अधिकारी कामाला लागले आहेत. मनपाचे सभागृह ९९ सदस्यांच्या आसन व्यवस्थेचे होते. आता त्यात नवीन सदस्यांना सामावून घेण्यासाठी दोन नवीन बेंचेस टाकण्यात आले आहेत. ११३ नगरसेवक व नंतर येणारे पाच स्वीकृत असे एकूण ११८ सदस्य सभागृहात असणार आहेत. तूर्तास या तात्पुरत्या आसन व्यवस्थेमुळे अधिकाऱ्यांची भिंतीलगत असलेली जागा काही प्रमाणात कमी झाली आहे.

वादंगाची शक्यता
महापौर निवडणुकीत सध्या दिसत असलेली चुरस पाहता वादंगाचे व तणावाचे प्रसंग येऊ शकतात. शिवाय महापौरपदाच्या निवडणुकीची उत्सुकता असणारे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने येणार आहेत. अशा स्थितीत या निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मनपाने पोलिस बंदोबस्त मागितला आहे.