आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॉप कॉलेजेस ‘फुल्ल’, ९० % मिळवणारेही कला शाखेला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - यंदा विद्यार्थ्यांनी दहावीत भरभरून गुण मिळवल्यामुळे शहरातील टॉपच्या महाविद्यालयांमध्ये नेहमीप्रमाणे विज्ञान शाखा फुल्ल झाल्या. तरीही यंदा वाणिज्य शाखेसह कला शाखेकडेही कल वाढला आहे. महाविद्यालयांच्या कटऑफ याद्या जाहीर झाल्या असून मोठ्या महाविद्यालयांमध्ये ९० टक्क्यांवर विज्ञान तर ८५ ला वाणिज्यला प्रवेश मिळत आहे. विशेष म्हणजे ९० टक्के गुण असणारे विद्यार्थीदेखील कला शाखेला प्रवेश घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या वर्षीपासून कला शाखेला येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून इंग्रजी माध्यमाची मागणी होत असल्याने खास इंग्रजी माध्यमातील तुकडी उघडण्यात आली आहे.

दहावीच्या निकालानंतर अकरावीच्या २०१६-१७ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशाकरिता महाविद्यालयांमध्ये रांगा दिसून येत आहेत. प्रवेश प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात आली असून शहरातील विवेकानंद महाविद्यालयाने यंदा प्रथमच ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवल्याची माहिती उपप्राचार्य प्रा.राजेंद्र पगारे यांनी दिली. शहरातील मोठ्या महाविद्यालयांमध्ये एकाच वर्गाच्या सात ते आठ तुकड्या असून प्रवेश क्षमता दीड ते दोन हजारांपर्यंत आहे. अनुदानित तुकड्यांसह व्यवस्थापन कोट्यातील जागादेखील आता हाऊसफुल्ल झाल्या आहेत.

विज्ञान शाखेचे प्रवेश आता बंद करण्यात आले असून वाणिज्य आणि कला शाखेचे प्रवेश सध्या सुरू आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत प्रवेश प्रक्रिया पूर्ण होणार असून जुलैपासून अकरावीच्या तासिकांना सुरुवात करण्यात येणार आहे. या तासिकांपूर्वी पालक सभादेखील घेण्यात येणार असल्याची माहिती देवगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.चंद्रकांत गायकवाड यांनी दिली.

कला शाखेला आली मागणी
यंदा स्पर्धा परीक्षेत मोठ्या प्रमाणावर वाढलेला मराठी टक्का आणि इंग्रजी माध्यमातून कला शाखेत पदवी मिळवण्याची विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. यामुळे खास इंग्रजी माध्यमातून वर्ग सुरू करण्यात आल्याचे स.भु.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जगदीश खैरनार यांनी सांगितले.

यंदा प्रथमच ऑनलाइन प्रयोग
यंदा प्रथमच कॉलेजने ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवली आहे. याला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाणिज्य शाखेकडे अधिक विद्यार्थी वळताना दिसत आहेत. विज्ञानपाठोपाठ वाणिज्य शाखेला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी प्रवेश घेत आहेत.

प्रवेशासाठी वशिला
प्रवेशासाठीराजकीय मंडळींचा दबाव ही काही नवीन बाब नाही. परंतु ४० आणि ४१ टक्के असणाऱ्यांनाही विज्ञान शाखेत प्रवेश द्या, म्हणून शहरातील नामांकित महाविद्यालयांवर दबाव आणला जात आहे. यासाठी गल्लीबोळातील राजकीय नेते विशेष पत्र लिहून पाठवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
बातम्या आणखी आहेत...