आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांनो, ‘त्या’ शंकांबाबत आता बोला बिनधास्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2007 मध्ये एका कार्यक्रमानिमित्त डॉक्टर, वकील, शिक्षिका, टॅक्स प्रॅक्टिशनर अशा विविध क्षेत्रांतील 20 महिला एकत्र आल्या. यातील बहुतांश सदस्यांची मुले किशोरवयीन म्हणजेच आठवी ते बारावीतील होती. या वेळी झालेल्या अनौपचारिक चर्चेतून प्रत्येकीलाच आपल्या मुलांच्या भावविश्वातील एक समान धागा सापडला. झपाट्याने बदलत चाललेल्या कौटुंबिक परिस्थितीतही सर्वात जास्त किंमत किशोरवयीन मुलांनाच मोजावी लागत आहे. या वयात शरीरात होणा-या बदलांबाबत मुलांमध्ये कुतूहल असते. काहीशी भीतीही असते. त्यांच्या मनात असलेल्या शंकांचे वेळीच निरसन होणे आवश्यक असल्याचे सर्वांच्या लक्षात आले. यातूनच जानेवारी 2007 मध्ये ‘स्वयंविकासातून समाजपरिवर्तनाकडे’ हे घोषवाक्य घेऊन स्त्री जागरण मंच या व्यासपीठाची स्थापना झाली.
आधी स्वत: प्रशिक्षण घेतले
ज्याबाबत मुलांना सांगायचे, समुपदेशन करायचे त्या गोष्टी आपल्यालाही समजाव्यात, या हेतूने आधी मंचच्या सदस्यांनी स्वत: प्रशिक्षण घेतले. डॉ. नाथानी, मैथिली दळवी, पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीच्या अनघा लवळेकर, मोहन देशपांडे यांच्या 4 दिवसांच्या कार्यशाळा आयोजित करून हा विषय माहीत करून घेतला. त्यानंतर मंच कामाला लागला. यातील साधना सुरडकर या नगरसेविका असल्यामुळे त्यांच्या पुढाकाराने मनपा शाळांमध्ये कार्यशाळा घेण्यास सुरुवात केली. नंतर सदस्यांनी शाळा-शाळांमध्ये जाऊन कार्यशाळा घेतल्या.
अशी चालते कार्यशाळा

कार्यशाळेत आरोग्य, मैत्री, प्रेम, आकर्षणाची संकल्पना, सुंदर दिसणे व सुंदर असणे यातील फरक, किशोरवयात होणारे शारीरिक व मानसिक बदल इत्यादी विषयांवर मुलांशी संवाद साधून त्यांना अंतर्मुख करण्याचा प्रयत्न केला जातो. मुलांचा सहभाग वाढेल, त्यांना मोकळेपणाने आपल्या मनातील सांगता येईल, असे हलके-फुलके वातावरण तयार केले जाते. पथनाट्य, खेळ, दृक्श्राव्य माध्यमे, गाणी, भूमिका नाट्य (रोल प्ले), गटचर्चा, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन अशा विविध माध्यमांतून मुलांना विषय समजावून सांगितला जातो. सुरुवातीला अबोल, लाजणारी मुले कार्यशाळा शेवटच्या टप्प्यात येईपर्यंत फाडफाड बोलायला लागतात, असा अनुभव आहे. 3 तासांपासून ते दोन दिवसांची कार्यशाळा हा मंच घेतो. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही, हे विशेष. याशिवाय वर्षातून दोन वेळा ‘दिशा’ ही दीड दिवसाची कार्यशाळा होते. ही कार्यशाळा ना नफा ना तोटा तत्त्वावर घेतली जाते.
प्रतिसादावरही होते चर्चा

प्रत्येक कार्यशाळेनंतर मंचचे प्रतिनिधी एक फीडबॅक फॉर्म भरून घेतात. यात आलेले अनुभव, कमतरता, बदल आदींबाबत मते जाणून घेतली जातात. नंतर मंचच्या शोध-बोध बैठकीत या फॉर्मवर चर्चा होऊन आवश्यक ते बदल किंवा नवीन बाबींचा समावेश केला जातो. अशा
पद्धतीने या मंचचे काम अधिकाधिक परिणामकारक होत चालले आहे. नियमित 20 सदस्यांसह नवीन सदस्यांसाठी दर महिन्याच्या दुस-यागुरुवारी गप्पाकट्टा हा उपक्रम आयोजित केला जातो.
किशोरवयीन मुला-मुलींच्या समस्या व उत्तरे
समस्या : मी त्याच्या/तिच्या प्रेमात पडलेय/पडलोय. आम्हाला लग्न करायचे आहे...
समाधान : प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी प्रेमात पडतेच, पण हे तुमचे प्रेमाचे वय नाही. आणखी 4 वर्षे थांबा. शिक्षण पूर्ण करा. चांगले करिअर करा. विचार करा व मगच निर्णय घ्या. या वयात प्रेमात पडले तर शिक्षण अर्धवट राहील.

समस्या : शिक्षण घेऊन काय करायचे आहे?

समाधान : शिक्षणाचा फायदा केवळ चांगली नोकरी किंवा चांगल्या करिअरसाठी नाही, तर एक चांगली व्यक्ती म्हणून जगण्यासाठी, आपले छंद जोपासण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे. चांगले शिक्षण घेतले तर चांगली समज येते. समाजात मान मिळतो. जीवन जगणे सोपे होते.
समस्या : मित्र सिगारेट ओढतात. ते मलाही आॅफर करतात. मी केले तर काय वाईट आहे?
समाधान : मुलांनी नाही म्हणायला शिकावे. अशा आॅफर एक-दोन वेळेस नाकारल्यानंतर पुन्हा तसे प्रस्ताव येत नाहीत. शिवाय आज ते सिगारेट आॅफर करतात, उद्या तंबाखू, दारूही पाजतील. नाही म्हणण्यात कमीपणा नाही. मुलांना व्यसनांचे दुष्परिणाम सांगावेत. (उर्वरित पान 4 वर)

शाळांनी संपर्क साधावा

2007 पासून आम्ही किशोरवयीनांसाठी कार्यशाळांचे आयोजन करत आहोत. आम्हाला अधिकाधिक मुलांपर्यंत पोहोचायचे आहे. यासाठी शाळांनी आमच्याशी संपर्क साधावा. सलग 3 तास किंवा महिन्यातून एका तासाची एक, अशा आम्ही कार्यशाळा घेऊ.
-डॉ. यशस्विनी तुपकरी, सदस्य, स्त्री जागरण मंच
जबाबदार पिढी घडवण्याचा मानस

आपले जीवन खूपच गुंतागुंतीचे होत चालले आहे. आई-वडिलांना नोकरीसाठी दिवसभर बाहेर राहावे लागत आहे. पूर्वी घरात आजी-आजोबा, काका, मोठे भाऊ असे सदस्य असायचे. त्यामुळे मुलांवर धाक असायचा. मात्र, आता एका घरात एकच मूल असते. टीव्ही, इंटरनेट आणि मोबाइलमुळे हे मूल जगाच्या संपर्कात येते. यामुळे वाईट गोष्टी लगेच मागे लागतात. यामुळेच आम्ही हा कार्यक्रम राबवत आहोत. यातून सुशिक्षित, आरोग्यदायी आणि जबाबदार पिढी घडवण्याचा आमचा मानस आहे.
-माधुरी आफळे, सदस्य, स्त्री जागरण मंच