आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्द्राची सलामी, दीड तासात 18 मिमी पाऊस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - चार दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने शुक्रवारी दीड तासात औरंगाबादकरांना चिंब भिजवले. दुपारी साडेतीन वाजता मृग नक्षत्र बदलले आणि आर्द्रा सुरू झाले. नक्षत्रबदल होताच चारच्या सुमारास सर्वत्र जोरदार जलधारा कोसळू लागल्या. रस्ते भरून वाहू लागले. कोरड्या पडलेल्या नाल्यांमधूनही पाणी खळाळू लागले. अनेक भागांत पाणी साचले होते. गजानन महाराज मंदिर परिसर आणि पंचवटी चौक येथे दोन झाडे उन्मळून पडली. चिकलठाणा वेधशाळेने शहरात 18.03 मिलिमीटर पावसाची नोंद केली आहे.

आठवडाभरापासून पाऊस सारखा हुलकावणी देत होता. अचानक आलेल्या या पावसाने सर्वांचीच तारांबळ उडाली. वाहनचालक आणि पादचार्‍यांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यांना मोठी कसरत करत वाहतूक करावी लागत होती. पाऊस जोरदार झाल्यामुळे नाल्यांनादेखील मोठय़ा प्रमाणात पाणी आले होते. नागेश्वरवाडीमधला नाला तर खळखळून वाहत होता.

इथे साचले पाणी

पाऊस पडताच अनेक ठिकाणी शहरात पाणी साचले होते. निराला बाजार परिसर, खडकेश्वर, जामा मशिदीसमोर गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे वाहनचालकांची तारांबळ उडाली. मकई गेटसमोर आणि टीव्ही सेंटर परिसरातही मोठय़ा प्रमाणात पाणी साचले होते.

मोंढा परिसरातील बत्ती गुल

पाऊस सुरू असतानाच मोंढा फीडरवरची या परिसरातली बत्ती गुल झाली. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास दोन 11 केव्ही तारांच्या घर्षणामुळे विद्युत प्रवाह बंद झाला. हमखास मैदानासमोर विजेचा धक्का लागून एका शेळीचा मृत्युमुखी पडली. त्यामुळे या भागात काही काळासाठी विद्युत प्रवाह बंद केला होता, अशी माहिती जीटीएलचे जनसंपर्क अधिकारी समीर पाठक यांनी दिली.

मृग गेला, आर्द्रा आले

शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेनंतर नक्षत्रामध्ये बदल झाला. मृग नक्षत्र संपले आणि आर्द्रा सुरू झाले. या नक्षत्राचे वाहन बेडूक आहे. नक्षत्रबदलाच्या जोडावर हमखास पाऊस पडतो, असे मानले जाते. नक्षत्राच्या प्रारंभी पाऊस झाला तर पंधरा दिवस नक्षत्रभर चांगला पाऊस होतो, असे अनंत पांडव गुरुजी यांनी सांगितले. सात वर्षांनंतर मृगात मोठा पाऊस पडला.