आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Adv. Prakash Ambedkar On Reservation In Aurangabad

आरक्षणामुळे देशाच्या एकात्मतेला तडा, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे परखड मत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद -आरक्षणामुळे जर जातीयवादी वृत्ती बळावत असेल तर त्याचा पुनर्विचार होणे आवश्यक आहे. जातीच्या बळावर मोठे झालेले प्रादेशिक पक्ष देशाच्या राजकारणात वर्चस्व गाजवत आहेत. त्यामुळे फुटीरतावादी वृत्ती वाढली असून देशाच्या एकात्मतेला तडा जात आहे, असे परखड मत भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
लोकनीती मंचच्या वतीने सोमवारी (आठ एप्रिल) मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात ‘राजकीय आरक्षण आणि जातीअंताचा लढा’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. ते म्हणाले, आरक्षण एकाच जातीची मक्तेदारी नाही. समाजात मागे राहिलेल्या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ते एक राजकीय व सामाजिक शास्त्र आहे. स्वातंत्र्यानंतर समाजात अस्पृश्यतेची भावना होती. त्यामुळे प्रथम जातीनिहाय आरक्षण देण्यात आले होते. आता ही परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे आरक्षणसाठी असलेल्या मुद्द्यांचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे.
राजकीय आरक्षणावर बोलताना ते म्हणाले, आतापर्यंत जातीनिहाय उमेदवारी मिळालेल्या आणि निवडून आलेल्या कोणत्याच प्रतिनिधीने त्या जातीच्या विकासासाठी भक्कम भूमिका मांडली नाही. त्यामुळे राजकारणात जातीच्या आधारावर आरक्षण हा मुद्दा आता कालबाह्य झाला आहे. 2020 पर्यंत जातीय आरक्षणाचा मुद्दा संपुष्टात येणे आवश्यक आहे. मराठा आरक्षणाबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले, आतापर्यंत सत्तेच्या मुख्य प्रवाहात असलेल्या समूहाला आपण मागे पडत आहोत, असे वाटत असल्याने आरक्षणाची मागणी जोर धरत आहे. अशा वेळी सहानुभूतिपूर्वक विचार करून त्यांना विशेष वर्ग म्हणून आरक्षण द्यायला हरकत नाही. देशातील जातीयवादी वृत्ती नष्ट करण्याचे काम हे आंबेडकरी विचारांच्या संघटनांनी करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ही व्यवस्था बदलण्यासाठी तरुणांनी समोर येऊन विद्रोह करावा.
... तर ते लोकांच्या डोक्यावरही लघुशंका
औरंगाबाद - दुष्काळग्रस्तांबाबत अजित पवारांनी केलेले विधान म्हणजे पैशाचा माज आहे. त्यांना वेळीच आवरले नाही तर उद्या ते लोकांच्या डोक्यावर लघुशंका करतील, अशी बोचरी टीका प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केली. यासंदर्भात काँग्रेसनेही आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली. आंबेडकर म्हणाले की, अजित पवार हे शरद पवारांचे नाव धुळीला मिळवत आहेत. शरद पवार समजदार आहेत, त्यांनी अजित पवारांना त्वरित आवरायला हवे. नसता उद्या ते लोकांच्या डोक्यावर लघुशंका करतील. अजित पवार यांच्या विधानाशी काँग्रेस सहमत आहे का, असा सवाल करीत ते म्हणाले की, अजित पवारांची हुकूमशाही काँग्रेसला मान्य आहे का ? नसल्यास त्यांनी राष्टÑवादीला सांगून अजित पवारांना मंत्रिमंडळातून वगळण्याची मागणी करायला हवी. या प्रकरणी काँग्रेसने भूमिका घेतली नाही तर त्यांचीही हुकूमशाही वृत्तीकडे वाटचाल होत आहे, असे मानावे.