औरंगाबाद- मोदी सरकारच्या काळात सामान्यांसाठी अच्छे दिन येणार नाहीत, तर अच्छे दिन सध्या फक्त भांडवलदार आणि कारखानदारांचे येत आहेत. राज्यात नेते नसल्यामुळे प्रचाराच्या काळात मोदींनी पीएमओ दिल्लीवरून मुंबईला आणले आहे, अशी बोचरी टीका भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. औरंगाबाद पूर्वमधील भाकपचे उमेदवार भालचंद्र कांगो यांच्या प्रचारासाठी गुरुवारी एन-५ येथील राजीव गांधी स्टेडियमवर सभा पार पडली. या सभेत आंबेडकर यांनी मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवली.
आंबेडकर म्हणाले की, नांदेडमध्ये जो हिंसाचार सुरू आहे तो केवळ निवडणुकीपुरता आहे. निवडणुकीनंतर तो
आपोआप निवळेल. सध्या मोदी सरकारचा कारभार आशादायक नाही. कोळसा घोटाळ्याच्या संदर्भात जे न्यायालयाने केले, ते मोदी सरकारलाही करता आले असते. मात्र, त्यांनी ते केले नाही. त्यामुळे सामान्यांना अच्छे दिन येत नसून भांडवलदार आणि कारखानदारांनाच चांगले दिवस येत आहेत. मोदी रोज सात-सात सभा घेत आहेत. त्यामुळे राज्यातले भाजप नेते पात्रतेचे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रचाराच्या काळात दिल्लीतून मुंबईत आलेले पीएमओ कायम मुंबईत राहावे, असे मत त्यांनी व्यक्त केले. सध्या मोदी देशाचे पंतप्रधान आहेत की गुजरातचे, असा समज जनतेत निर्माण झाला आहे. केंद्राला िनधी पुरवण्याचे काम महाराष्ट्र करते. मात्र, राज्याला कमी लेखले जात आहे, असेही ते म्हणाले
70 च्या वर कोणत्याच पक्षाला जागा नाहीत : मी राज्यात सर्वत्र फिरत आहे. अर्धा महाराष्ट्र फिरून झाला आहे. राहिलेल्या ठिकाणांची माहिती घेतली. कोणत्याही पक्षाला 70 पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत. भाजपने तर 50 टक्के उमेदवार आयात केले आहेत. त्यामुळे ते स्वबळावर येणार कसे, असा सवाल त्यांनी केला.