आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंमत असेल तर राममंदिर बांधाच ! जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा अॅड. डोळस यांचे आवाहन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अनेक वर्षांपासून राममंदिराचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. यावरून अनेकदा दंगली घडवून आणल्या आहेत. आता सरकार तुमचेच आहे. हिंमत असेल तर अयोध्येत राम मंदिर बांधा, असे आवाहन जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा अॅड. वैशाली डोळस यांनी केले. मराठा सेवा संघाच्या वतीने सावित्री लॉन्स येथे आयोजित बळीराजा महोत्सवात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

"इडा पिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे' या विषयावर बोलताना अॅड. डोळस म्हणाल्या की, शेतकऱ्यांचे जीवन पूर्णत: मान्सूनवर अवलंबून आहे. पर्जन्यमान चांगले झाले तरच तो आनंदात सणवार साजरा करू शकतो. अन्यथा त्याच्यासारखी दयनीय अवस्था कुणाचीच नसते. सततच्या दुष्काळाने शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. याविषयीच्या बातम्या वाचून खूप वाईट वाटते. शेतकरी कुटुंब हलाखीचे जीवन जगत आहेत.

आपण त्यांना बळीराजा म्हणतो. त्या बळीराजाची परिस्थिती सुधारण्यासाठी आपण एकत्रित येऊन काही करणार आहोत की नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. बळीराजा कोण होता हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. बळीराजा तत्त्वज्ञानी होता. त्यांच्या काळात सर्व जनता सुखी समृद्धी होती. त्यांच्याविषयी चुकीचा इतिहास लिहिला गेला आहे.

महात्मा फुले यांनी वामनाने मागितलेल्या तीन दानांचे सत्य सर्वांसमोर आणले. एक पाऊल जमीन दुसरे संपूर्ण ब्रह्मांडावर ठेवले तेव्हा फाटले कसे नाही, असे उदाहरण देऊन कपोलकल्पित कथांचे भंडाफोड करून बळीराजाची महानता स्पष्ट केली. बळीराजाची पूजा करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन मराठा सेवा संघाचे प्रदेश प्रवक्ता विंग कमांडर टी. आर. जाधव यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनसोडे, प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक श्रीधर म्हस्के, पी. एस. जाधव, एस. एस. शिंदे, लक्ष्मीकांत सुर्वे, डॉ. राम चव्हाण, नारायण खडके, जयाजी सूर्यवंशी, विजय काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

उमप यांच्या भारुडाने रंगत
कार्यक्रमाचीसुरुवात शाहीर मीरा उमप यांनी "सोन्याची माय, सुई घे पोत घे माय...' या भारुडाने केली. नळावर पाण्यासाठी आज कशा प्रकारे भांडण होत आहे याचे वास्तव त्यांनी गीतातून सादर करत प्रबोधन केले. भारुडाने कार्यक्रमात रंग भरला.

मराठा आरक्षणात खोडा
मराठासमाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. त्याला गतवर्षी सरकारने मान्यता दिली. पण अमेय तिरोडकर यांना ते आवडले नाही. त्यांनी न्यायालयात दाद मागून स्थगिती मिळवली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्यासाठी लढा पुन्हा तीव्र करावा लागणार आहे. २१ नोव्हेंबर रोजी क्रांती चौक येथे आंदोलन करण्यात येणार आहे. सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन चंद्रकांत बनसोडे, अॅड. डोळस यांनी केले.