आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अ‍ॅड. नीलेश घाणेकर गजाआड, सुपारी देऊन स्वत:वर झाडून घेतल्या गोळ्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महिला वकिलाने आपल्यावर गोळीबार केल्याचे भासवून तिला गुन्ह्यात अडकवण्याचा कट प्रख्यात वकील नीलेश घाणेकरने स्वत:च रचल्याचे स्पष्ट झाले. अ‍ॅड. घाणेकरने स्वत:च सुपारी देऊन गोळीबाराचे नाट्य रचल्याचे अटक केलेल्या शार्प शूटरने कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. त्याची माहिती मिळताच तो शनिवारी (२३ मे) रात्री नऊ वाजेच्या सुमारास स्वत:हून गुन्हे शाखेकडे हजर झाला. त्याला अटक करून सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

पोलिसांनी सांगितले की, वर्षभरापूर्वी घाणेकरसोबत ज्युनियर म्हणून काम करत असलेल्या अ‍ॅड. स्मिता लेंडवे पाटील २५ लाखांची खंडणी मागत असल्याची तक्रार घाणेकरने पोलिसांत दिली होती. त्यावरून अ‍ॅड. पाटील यांना अटकही झाली होती. त्यानंतर पाच मे रोजी घाणेकर त्याच्या जालना रोडवरील कार्यालयातून बाळापूर येथील घरी जात असताना रात्री बारा वाजेच्या सुमारास संग्रामनगर उड्डाणपुलाकडून बीड बायपासकडे वळताना त्याच्यावर गोळीबार झाला. दुचाकीवरून आलेले दोघे गोळ्या झाडून पळून गेले. त्यांचे चेहरे मी पाहू शकलो नाही. मात्र, यामागे अ‍ॅड. पाटीलच असल्याची तक्रार घाणेकरने नोंदवली होती. त्यावरून पोलिसांनी अ‍ॅड. पाटील यांना ताब्यातही घेतले. मात्र, ठोस पुरावे हाती लागले नाही.

बनावाचा संशय होताच...
घाणेकर अनेक गुन्हेगारांचे वकिलपत्र घेत असल्याने हा गोळीबार म्हणजे त्याचाच बनाव असावा, असे काही पोलिस अधिकार्‍यांचे म्हणणे होते. संग्रामनगर उड्डाणपुलाच्या दक्षिणबाजूस बीड बायपास रस्त्यावर लावलेल्या सीसीटीव्हीची केबल तुटली असल्याने गोळीबाराच्या घटनेचे फुटेजही उपलब्ध नव्हते. त्यामुळे गोळीबार करणार्‍यांना शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार चक्रे फिरली. दुसरीकडे यापूर्वी गोळीबार केलेल्या काहीजणांची प्रकरणे घाणेकरकडे आहेत का, याचाही तपास सुरू झाला.

लष्करे प्रकरणातील आरोपी
२२ मे रोजी मुजफ्फर शेख (२१, रा. अहिल्यानगर, नेवासा फाटा) याला अटक करण्यात आली. तीन वर्षापूर्वी छावणी येथे वाळू तस्कर लष्करेवरील गोळीबारात मुजफ्फरच्या वडिलाचा हात होता. त्याचे वकिलपत्र घाणेकरने घेतले होते. मात्र, पोलिसी खाक्या दाखवूनही त्याने कुणाच्या सांगण्यावरून गोळीबार केला याची माहिती दिली नाही. परंतु, साथीदाराचे नाव सांगितले. पोलिसांनी तातडीने चक्रे हलवत शनिवारी सय्यद मुजीब (३४, रा. अन्सार कॉलनी, पडेगाव) याला अटक केली. तासभर प्रश्नांची सरबत्ती करताच त्याने तोंड उघडत घाणेकरने सुपारी दिल्याची कबुली दिली.

नोटीस चिटकवली होती
मग पोलिसांनी घाणेकरच्या घरी व कार्यालयावर अटकेची नोटीस चिटकवली. याची माहिती मिळताच शनिवारी रात्री नऊच्या सुमारास घाणेकर स्वत: गुन्हे शाखेत दाखल झाला. त्याला अटक करून सातारा पोलिस ठाण्यात पाठवण्यात आले. तेथे रात्री उशिरापर्यंत त्याची चौकशी सुरू होती. ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस उपायुक्त संदीप आटोळे, सहायक पोलिस आयुक्त बाबाराव मुसळे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक सुभाष खंडागळे यांनी केली.