औरंगाबाद- मागासवर्गीयांना शिक्षणात आरक्षण देण्याची गरज नाही, ते रद्द करावे, असा अहवाल केंद्र सरकारने तयार केला अाहे, असा अाराेप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी केला.
भारिप बहुजन महासंघाचा मराठवाडा विभागीय मेळावा शनिवारी पार पडला. कार्यकर्त्यांच्या मनोगतानंतर अॅड. आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळांचे पॅकेज दोन वर्षांपासून का दिले जात नाही, या प्रश्नावर ते म्हणाले, पॅकेजच नाही तर मागासवर्गीयांना देण्यात येणारे शिक्षणातील आरक्षणच रद्द करण्याचा अहवाल केंद्राने तयार केला असून लवकरच तो राज्यात येणार आहे. त्यातून महामंडळांना कोंडीत पकडून आरक्षणच संपवण्याचा डाव आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. पाकिस्तानातील अतिरेक्यांना देशातील हिंदू अतिरेकीच मदत करतात, असा आरोप करून ते म्हणाले, पठाणकोटवरील हल्ल्याला याच हिंदू अतिरेक्यांनी सहकार्य केले आहे. पाकिस्तानी अतिरेक्यांचे देशात हिंदू हस्तक आहेत. त्यांचा वेळीच बंदोबस्त केल्यास भविष्यात मोठा हल्ला झाल्यास आश्चर्य वाटायला नको, असेही ते म्हणाले.
जायकवाडीच्या पाण्यात बोटीचा वापर करण्याची सूचना नितीन गडकरी यांनी केली होती. गडकरी यांनी बोटीऐवजी १५ टक्के पाणीसाठा वाढवण्यासाठी नाथसागरातील गाळ काढा, असा सल्ला आंबेडकर यांनी दिला. सत्ता कुणाचीही असो, दलितांवरील अन्याय अत्याचारात फरक पडत नाही. मराठ्यांनी मराठी नेत्यांच्या मागे पळणे साेडावे. कारण त्यांचे नेते करोडपती तर मराठे गरीब होत आहेत, असे आंबेडकर म्हणाले.