आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगाराच्या क्रौर्यामुळेच आरोपीला फाशी; प्रीती राठी खटल्याचे स्पष्ट केले अंतरंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- कायद्यात दुरुस्ती करण्यामागचा सरकारचा उद्देश, आरोपीने गुन्हा करण्यासाठी केलेले नियोजन आणि त्यातले क्रौर्य न्यायालयाच्या लक्षात आणून दिले. त्यामुळेच प्रीती राठी अॅसिड हल्ला प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा झाली, असे या खटल्यातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केले. त्यांनी केलेल्या युक्तिवादानंतर फाशीची शिक्षा झालेला अंकुर पनवार हा ३८ वा गुन्हेगार ठरला आहे.

‘दिव्य मराठी’शी संवाद साधताना अॅड. निकम म्हणाले, निर्भया प्रकरणानंतर भारतीय दंड संहितेत झालेल्या दुरुस्तीत अॅसिड हल्ल्याचा समावेश स्त्रीवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात बलात्काराइतकाच गंभीर गुन्हा म्हणून करण्यात आला आणि त्यासाठी कठोर शिक्षेचीही तरतूद करण्यात आली. मात्र, त्यामुळे अंकुर पनवारला फाशीची शिक्षा दिली गेली, असे म्हणणे योग्य होणार नाही. मुलींवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये झालेली वाढ लक्षात घेता गुन्हेगारांना जरब बसावी, यासाठी कठोर शिक्षेची तरतूद करणे हा कायद्यातील या दुरुस्तीमागे सरकारचा उद्देश होता, ही बाब न्यायालयासमोर प्रभावीपणे मांडली. त्यानंतर गुन्ह्याच्या घटनेसाठी आरोपीने केलेले नियोजन न्यायालयासमोर उलगडून दाखवले. त्याने मार्च २०१३ मध्येच प्रीतीला प्रपोज केले होते, मात्र तिने नकार दिला होता.

घटनेच्या १० दिवस आधीही तिने मुंबईला जाऊ नये म्हणून त्याने धमकी दिली होती. तरीही तिने ऐकले नाही म्हणून त्याने ठरवून तिला संपवले हे स्पष्ट करून दिले. जर त्याला प्रीतीचा चेहराच विद्रूप करायचा असता तर त्याने १००-२०० मि.लि. लिटर अॅसिड आणले असते. पण त्याने दोन लिटर अॅसिडची कॅनच तिच्यावर रिकामी केली. तिच्या तोंडात अॅसिड जाईल हे पाहिले. त्यामुळे त्याने प्रीतीला मारण्याचाच कट केला होता आणि ते मरणही अत्यंत निर्घृण असावे, हेच त्याने ठरवले होते हेही न्यायालयाला पटवून दिले. त्याचे क्रौर्य स्पष्ट करण्यासाठी बकरीचे उदाहरण दिले.

खाटीक बकरीचा गळा कापतो त्या वेळी तिला त्यामागचे कारण माहिती नसते आणि काही क्षणांत ती प्राण सोडते. पण प्रीती त्यापेक्षाही अधिक दुर्दैवी ठरली. कारण तिला सारे काही कळत होते, पण तब्बल महिनाभर ती तडफडत राहिली. यातून आरोपी कसा सैतानी प्रवृत्तीचा आहे हे न्यायालयाला पटवून दिले. त्याचा परिणाम म्हणून न्यायालयाने आरोपीला कठोर शिक्षा दिली आहे, असेही निकम म्हणाले.

३८ फाशी, ६२९ जन्मठेप
अॅड.उज्ज्वल निकम यांनी आतापर्यंत ज्या ज्या खटल्यांमध्ये सरकारची बाजू मांडली आहे त्यात फाशीची शिक्षा दिले गेलेले एकूण ३८ गुन्हेगार आहेत. याशिवाय त्यांच्या युक्तिवादानंतर आतापर्यंत ६२९ जणांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. दरम्यान, कोपर्डी प्रकरणातही उज्ज्वल निकम यांनी आरोपपत्र स्वीकारले असून त्या निकालाकडेही साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
बातम्या आणखी आहेत...