आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Advanced Laboratory Is Need For Checking Of Hazardous Components

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घातक घटकांच्या तपासणीसाठी गरज अत्याधुनिक प्रयोगशाळेची

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मॅगीमध्ये आरोग्यास अपायकारक ठरणारे घटक आढळल्यानंतर खाद्यपदार्थांच्या तपासणीचा मुद्दा सगळीकडे गाजत आहे. त्यातच औरंगाबाद शहरात खाद्यपदार्थांची अचूक तपासणी करणारी एकही प्रयोगशाळा नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांचे नमुने पुण्याला पाठवावे लागत आहेत. शहरात एक अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
शहरात प्रशासकीय, कृषी, अन्न औषध प्रशासन, पर्यावरण, एसटी, सामाजिक न्याय आदी विभागांची विभागीय स्तरावरील कार्यालये आहेत. तसेच घाटी रुग्णालयात मराठवाड्यासह शेजारील खान्देश, विदर्भातील रुग्ण उपचार घेतात. परंतु खाद्यपदार्थांतील घातक घटकांचे परीक्षण करण्यासाठी तसेच आरोग्यासंदर्भातील तपासण्यांसाठी शहरात एकही अद्ययावत प्रयोगशाळा नाही. शहराचा भविष्यात होणारा विकास पाहता येथे प्रयोगशाळा उभारण्याची गरज आहे.
आरोग्य विभागाच्या प्रयोगशाळेत होतात किरकोळ तपासण्या: राज्यशासनाकडून शहरात एकच मोठी आरोग्य विभागाची प्रयोगशाळा छावणीत सुरू करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेत दूषित पाण्याचे नमुने प्राधान्याने तपासले जातात. तसेच अन्न औषध प्रशासन विभागाच्या लहानमोठ्या तपासण्याही येथे होतात. गुंतांगुतीचे आणि केमिकलचे अचूक निदान करण्यासाठी सर्व नमुन्यांची येथे तपासणी होत नाही.
पुण्याचा एकच पर्याय : पाण्यामधीलकेमिकलची तपासणी करायची असल्यास पाण्याचे नमुने त्याचबरोबर डेंग्यू, स्वाइन फ्लू यासह भाजीपाल्यातील घातक द्रव्यांची तपासणी आणि अन्नपदार्थांतील भेसळ केलेल्या घटकांचे परीक्षण करण्यासाठी सर्व नमुने थेट पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात येतात. अहवालासाठीही प्रतीक्षा करावी लागते.
१५ दिवसांनंतरही मॅगीचा अहवाल नाही
देशभरात मॅगीचे प्रकरण गाजत असताना अन्न औषध प्रशासनाने स्थानिक बाजारातून दोन मॅगीचे नमुने घेतले होते. त्याचे परीक्षण करण्यासाठी ते नमुने २२ मे २०१५ पासून छावणी प्रयोगशाळेत पाठवले. मात्र, येथे मनुष्यबळाचा अभाव असल्याने त्याचा अहवाल १५ दिवस होऊनही अद्यापपर्यंत मिळालेला नाही. हा अहवाल आल्यावरच शहरातील मॅगीबाबत विचार होणार आहे.
अन्न औषध प्रशासन विभागाने त्यांच्या कार्यालयावर एक लॅब तयार केली आहे. मात्र, परीक्षण करून विश्लेषण करणारा येथे कुणीच नाही. त्यामुळे अनेक वर्षांपासून ही लॅब बंद पडली आहे. याच विभागाची कांचनवाडी येथे सुसज्ज आणि भव्य अशी प्रयोगशाळा तयार करण्यात येत आहे. ११ कोटींची ही तीनमजली इमारत असून अद्यापपर्यंत साडेआठ कोटी रुपये देण्यात आले आहेत. उर्वरित निधी मिळाला नसल्याने हे काम अद्यापही अपूर्ण आहे. काम पूर्ण होण्यासाठी किमान एक वर्षाचा कालावधी लागू शकतो.
प्रयोगशाळा बंद; नमुने पुण्याला
- अन्न औषध प्रशासनाकडे परीक्षण करून विश्लेषण करणारा कर्मचारी -अधिकारी वर्ग नाही. त्यामुळे आमच्याकडील प्रयोगशाळा बंद आहे. आम्ही नमुने छावणी अथवा पुण्याला पाठवतो.
चंद्रशेखर सोळुंके, सहआयुक्त, अन्न औषध प्रशासन.