आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आमिष दाखवून वकिलाने तरुणांना गंडवले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - विविध जिल्ह्यांतील सत्र न्यायालयांत लिपिक व शिपाई म्हणून नोकरी लावून देण्याच्या आमिषाने वकील व त्याच्या मैत्रिणीने नऊ तरुणांना सुमारे 1 लाख 67 हजारांना गंडवले. त्यांनी न्यायाधीशांच्या बनावट सह्यांचे नियुक्तिपत्रही तरुणांना दिले आहे. फसवणूक झालेल्यांमध्ये बुलडाणा आणि शहरातील नऊ तरुणांचा समावेश आहे. या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना 6 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली .
मूळचा नागपूरचा रहिवासी वकील पद्माकर हरिभाऊ साळवे आणि त्याची मैत्रीण रजनी हे दोघे बुलडाण्याला राहत होते. रजनी ही पत्नी असल्याचे तर वडील सेवानिवृत्त न्यायाधीश आणि भाऊ सहायक पोलिस आयुक्त असल्याचे तो सांगायचा. महाराष्ट्रातील विविध जिल्हा सत्र न्यायालयांत मागासवर्गीयांचा अनुशेष भरण्यासाठी लिपिक आणि शिपायांच्या जागा रिक्त असल्याचे सांगून त्याने नोकरी लावून देण्यासाठी प्रत्येकी 2 लाख रुपयांची मागणी केली.

असा घातला गंडा - बारावी पास तरुणांसाठी लिपिकाची जागा तर दहावी नापास तरुणांसाठी शिपायांच्या जागा असल्याचे तो सांगायचा. सुरुवातीला त्याने 15 हजार रुपये व शैक्षणिक कागदपत्रे, जातीचे प्रमाणपत्र व रहिवासी दाखले तरुणांकडून घेतले. लोणार तालुक्यातील इरफान शहा मेहबूब शहा, सुदाम सिद्धेश्वर वायाळ, शेख निसार शेख रज्जाक यांनी त्याला जमेल तसे पैसे देण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी काही मित्रांनाही याबाबत सांगितले. तेव्हा इम्रान शहा भिकन शहा (रा. लोणी), अलीम शहा अल्लाउद्दीन शहा (चिखली), मन्सूर शहा करीम शहा (लोणार), इरफान शहा मोबीन शहा, फिरोज शहा खलील शहा (देऊळगाव राजा) आणि औरंगाबादेतील वसीम शहा हुसेन शहा यांनीही साळवेशी संपर्क साधून त्याला शैक्षणिक कागदपत्रे दिली.
या सर्वांची कागदपत्रे घेतल्यानंतर साळवेने शंभर रुपयांच्या मुद्रांकावर प्रतिज्ञापत्राखाली त्यांच्या स्वाक्षर्‍या घेतल्या. स्वाक्षरी करणार्‍या इरफान शहा, फिरोज शहा, मन्सूर शहा आणि इम्रान शहा यांना त्याने नाशिकला बोलावून नोकरी पक्की झाल्याचे सांगितले. त्यानंतर ते सगळे मुंबई व तेथून अजमेरला गेले. 14 जुलै रोजी परतल्यावर ते मुंबईच्या सीएसटी रेल्वेस्थानकावर आले. यानंतर साळवे नोकरीचे नियुक्तिपत्र घेऊन येतो म्हणून तेथून जवळच असलेल्या न्यायालयात गेला. काही वेळानंतर येऊन न्यायालयाचा कर्मचारी अकोल्याला नियुक्तिपत्र घेऊन गेल्याचे त्याने सांगितले. यानंतर त्याने चौघांना अकोल्याला नेले. पैसे ऑ जमल्यावर फोन करा आणि औरंगाबादच्या अथर्व लॉजमध्ये या,’ असे सांगत निघून गेला.
असा अडकला जाळ्यात - तरुणांनी रजनीशी संपर्क साधला तेव्हा तिने तरुणांना पैसे घेऊन औरंगाबादला बोलावले. त्यानुसार मंगळवारी हे तरुण शहरात आले. संशय आल्याने त्यांनी थेट पोलिस आयुक्त संजय कुमार यांची भेट घेतली. त्यांच्याकडे तक्रार दिल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, उपनिरीक्षक विश्वास पाटील, जमादार संदेश कीर्तीकर, दीपक ढोणे, विक्रम वाघ, विवेक कदम, महेश उगले आणि दादासाहेब झारगड यांनी अथर्व हॉटेलमधील रूम नं. 201 मध्ये असलेल्या साळवे आणि रजनीला पकडले.