आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 कोटी खर्च करूनही औरंगाबाद शहरातील जलकुंभ रिकामाच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शिवाजीनगर परिसरातील लक्ष्मीनगर व देशमुखनगरलगत 2006 मध्ये 1 कोटीवर रक्कम खर्च करून 26 दशलक्ष लिटर क्षमतेचा जलकुंभ उभारण्यात आला. त्यात पाणीही सोडण्यात आले, पण फक्त एक ‘टी’ जोडली नसल्याने हा जलकुंभ 7 वर्षांपासून वापराविनाच पडून आहे. दुसरीकडे आसपासच्या परिसरातील मुले या जलकुंभातील घाण पाण्यात पोहतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला व जीविताला धोका होऊ शकतो, परंतु याचे सोयरसुतक मनपाला आणि जीवन प्राधिकरणाला नाही.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाणीपुरवठा योजनेअंतर्गत मार्च 1999 मध्ये पुंडलिकनगर, मातोर्शीनगर, भानुदासनगर व आसपासच्या भागासाठी 1 कोटी 16 लाख 80 हजार रुपये खर्चून जलकुंभ उभारला. 2006 मध्ये याचे काम झाले. त्यानंतर चाचणीसाठी त्यात पाणी टाकण्यात आले. पालिकेच्या अधिकार्‍यांना ही बाब लक्षात आणून दिली. महापौर दालनात खास बैठकही झाली. पण हा जलकुंभ कार्यान्वित झाला नाही. शहराची पाणीपुरवठा योजना एप्रिल 1998 पासून पालिकेच्या ताब्यात आली. मात्र, जलकुंभास जोडणार्‍या वाहिनीचे क्रॉस कनेक्शन व रोड क्रॉसिंगची कामे प्रलंबित आहेत. याबाबतची परवानगी मनपाकडे तीन वर्षांपासून मंजुरीसाठी पाठवलेली आहे. मात्र, त्यांनी मंजुरी दिलेली नसल्याचे जीवन प्राधिकरणाचे म्हणणे आहे, तर हा जलकुंभ प्राधिकरणाने बनवला असून त्याची जबाबदारी आमच्याकडे नाही. अजून त्याचे हस्तांतरणच झालेले नसल्याचे मनपा म्हणते. या वादात जलकुंभ नुसताच बांधून वापराविना पडून आहे.
मुलांना धोका
या सगळ्या गोष्टींना मनपा आणि जीवन प्राधिकरण जबाबदार आहे. सुरक्षा रक्षक नसल्याने येथे मुले पोहतात. त्यामुळे कधीही धोका होऊ शकतो. आजच्या दुष्काळाच्या काळात याचा वापर केला तर लोकांची तहान भागेल.
कल्याण हिवाळे, तालुकाप्रमुख, मनसे
पालिकेचा संबंध नाही
वाढीव पाणीपुरवठय़ासाठी हा जलकुंभ बांधला होता. मात्र, पाणी उपलब्ध करून देण्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला अपयश आले. त्यांनी पाणी उपलब्ध करून दिल्यास जलकुंभ कार्यान्वित होईल. जलकुंभ पालिकेत हस्तांतरित झालेला नाही. यामुळे जलकुंभाच्या देखभाल- दुरुस्तीची जबाबदारी आमची नाही. हा जलकुंभ पालिकेच्या वापरात नाही.

हेमंत कोल्हे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग
मनपाकडून परवानगी नाही

पाणीपुरवठा वितरण करणार्‍या जलवाहिन्या प्राप्त झालेल्या आहेत. त्यावर 116.80 लाख एवढा खर्च झालेला आहे. शिवाजीनगर जलकुंभाला जोडावयाच्या वाहिनीसाठी रोड क्रॉसिंग व क्रॉस कनेक्शनची परवानगी मनपाकडे तीन वर्षांपासून मंजुरीसाठी पाठवलेली आहे. मात्र, त्यांनी मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे या जलकुंभातून होणारी पाणी वितरण व्यवस्था खोळंबलेली आहे.
जी. ए. नुरुल्ला , कार्यकारी अभियंता, म.जी. प्रा.,औरंगाबाद