आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM SPL:23 वर्षांनंतर मागणी मान्य; पण 64 हजार डाॅक्टरांना अभ्यासक्रम पूर्ण करायला हवीत 53 वर्षे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- एक वर्षाचा फार्माकाेलाजीचा अभ्यासक्रम पूर्ण न करताच होमिओपॅथिक डाॅक्टर ग्रामीण भागात अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करीत आहेत. त्यांना पायबंद बसावा म्हणून औषध विक्रेत्यांना औषधाची शिफारस करणाऱ्या डाॅक्टरचा तपशील संबंधित ई-पोर्टलवर अपलोड करण्याची सक्ती केली आहे. मात्र, उपलब्ध असलेल्या २४ महाविद्यालयांतून हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी होमिओपॅथीच्या डाॅक्टरांनी प्रयत्न केले तरी राज्यात अस्तित्वात असलेल्या ६४ हजार होमिओपॅथिक डाॅक्टरांना प्रशिक्षित करायला किमान ५३ वर्षे लागतील. तोपर्यंत ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवेचे काय करायचे, असा प्रश्न काेर्टासमोर गेला आहे.

अॅलोपॅथीचा अभ्यास न करताच होमिओपॅथीच्या डॅाक्टरांनी अॅलोपॅथीची औषधे लिहून देणे धोकादायक आहे, असा दावा करीत त्यांना अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करायला बंदी घालण्याची मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने केली होती. तशी बंदी घालण्यातही आली. मात्र, एमबीबीएस किंवा त्यापुढचे वैद्यकीय शिक्षण घेतलेले पदवीधर ग्रामीण भागात जात नाहीत. त्यामुळे ग्रामीण रुग्ण होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सेवेवरच विसंबून आहेत याची जाणीव राज्य सरकारला आहे. त्या पार्श्वभूमीवर होमिओपॅथिक डॉक्टरांना अॅलोपॅथीच्या औषधांचे प्रशिक्षण देऊन त्यांना परवानगी देण्यात यावी यासाठी होमिओपॅथिक इंटिग्रेटेड मेडिकल प्रॅक्टिशानर्स असोसिएशनने (हिंपम) सन १९९३ पासून पाठपुरावा केला. १९९९ मध्ये ती सूचना मान्य झाली. पण अमलात यायला २०१६ साल उजाडले. मागच्या वर्षी १३ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत प्रत्येकी ५० जागांसह हा अभ्यासक्रम सुरू झाला. यंदा त्यात ११ खासगी महाविद्यालयांची भर पडून ती संख्या २४ वर पोहोचली आहे. म्हणजे दरवर्षी १२०० होमिओपॅथिक डॉक्टर्स हे प्रशिक्षण पूर्ण करू शकतील. त्यामुळे राज्यात सध्या असलेल्या ६४ हजार डॉक्टरांना तो पूर्ण करण्यासाठी ५३ वर्षे लागतील. हिंपमच्या सदस्य असलेल्या १० हजार जणांनादेखील किमान ८ वर्षे लागतील, ही वस्तुस्थिती आहे.

ई-पोर्टलने केली अडचण
ज्यांनी एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे अशा होमिओपॅथिक डॉक्टरच्या शिफारशीवरून औषध विक्रेत्यांनी अॅलोपॅथीची औषधे रुग्णाला दिली तरी त्या विक्रेत्यावरच कारवाई होऊ शकते. त्यामुळे ई-पोर्टलवर तपशील अपलोड करण्याच्या अटीने औषध विक्रेते आणि होमिओपॅथिक डॉक्टरांचीही अडचण केली आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील रुग्णांनी काय करायचे, हा प्रश्न घेऊन केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन न्यायालयात गेली आहे. त्यामुळे हा मुद्दा आता न्यायप्रविष्ट झाला आहे.

राष्ट्रीय पातळीवर गेला मुद्दा
होमिओपॅथिक डॉक्टरांना अॅलोपॅथिक औषधांची प्रॅक्टिस करू द्यायला इंडियन मेडिकल असोसिएशनचा विरोधच आहे. जूनमध्ये दिल्लीत झालेल्या संघटनेच्या आंदोलनातही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. आता हा मुद्दा आमची राष्ट्रीय कार्यकारिणीच हाताळत आहे.
- डाॅ. रमेश रोहिवाल, अध्यक्ष आयएमए, औरंगाबाद 

...तरी प्रकरण न्यायप्रविष्ट
ईपोर्टलच्या नियमानुसार फार्माकोलॉजी कोर्स केल्यानंतरही होमिओपॅथिक डॉक्टरांच्या नावे औषध देता येणार नाहीत. हा पेच सोडवण्यासाठी प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे ग्रामस्थांचा जीव टांगणीवर येईल. म्हणूनच आमचा ई-पोर्टलला विरोध.
- रावसाहेब खेडकर, अध्यक्ष केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन
बातम्या आणखी आहेत...