आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Collector's Prohibition Construction Contiune At Satara Parisar

जिल्हाधिका-यांच्या मनाईनंतरही सातारा परिसरात बांधकामे सुरू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पिण्यासाठी पाणीच उपलब्ध होत नसल्याने सातारा परिसरातील सर्व बांधकामे थांबवण्याचे आदेश जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी महिन्याच्या प्रारंभी घेतलेल्या बैठकीत बांधकाम व्यावसायिकांना दिले होते. त्यानुसार 15 एप्रिलनंतर सर्व कामे बंद होतील, अशी ग्वाही बांधकाम व्यावसायिकांनीही दिली होती, परंतु प्रत्यक्षात येथील बांधकामे बंद झालेली नाहीत. परिणामी बांधकामासाठी भूगर्भातील पाण्याचा बेसुमार उपसा सुरूच असल्याचे दिसून आले. या भागात दहा हजारांवर बांधकामे सुरू असावी, असा अंदाज आहे.

महानगरपालिका हद्दीत पाणीपुरवठा योजना असल्याने जमिनीखालील पाण्याचा जास्त उपसा होत नाही. मात्र सातारा परिसर, देवळाई व बीड बायपास रोड येथे पाणी योजना नाही. त्यामुळे येथील नागरिक विहिरी, बोअरच्याच पाण्यावर विसंबून आहेत. वापराच्या तुलनेत बांधकामासाठी जास्त पाणी लागत आहे. दुसरीकडे मे महिन्यात आहे ते पाणीही संपू शकते. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी बांधकाम व्यावसायिकांची बैठक घेऊन बांधकामे थांबवण्याची सूचना केली होती. त्यानंतर तहसीलदारांनी तसे आदेशही दिले होते. मजुरांवर बेरोजगारीची वेळ येऊ नये, म्हणून पालिका हद्दीतील कामांबाबत त्यावेळी कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. सुरू असलेली कामे 15 एप्रिलपर्यंत संपवावी अन त्यानंतर एकही काम हाती घेऊ नये असे स्पष्ट करण्यात आले होते.

अवैध बांधकामाचा सुळसुळाट
या भागात 80 टक्के बांधकामे अवैधपणे सुरू असल्याचे बिल्डर्सर्नी जिल्हाधिकार्‍यांच्या लक्षात आणून दिले होते. बांधकाम परवानगीशिवाय ही बांधकामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर रोख लावणे आवश्यक असल्याचे क्रेडाईचे माजी अध्यक्ष प्रमोद खैरनार यांनी स्पष्ट केले होते. मात्र प्रत्यक्षात काहीही झाले नाही. परिणामी या भागातील कामे सुरू असल्याचे दिसून येते.

बांधकामे थांबवण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी आदेश दिल्याचे मी वृत्तपत्रात वाचले होते. मात्र प्रत्यक्षात येथील चित्र बदलले नाही. कोणती बांधकामे अधिकृत अन् कोणती अनधिकृत हे मी सांगू शकत नाही, पण पहिल्याप्रमाणेच येथील बांधकामे सुरू आहेत, एवढे मात्र खरे. एकीकडे नागरिक पाण्यासाठी हंडे घेऊन धावतात अन् दुसरीकडे बांधकामावर पाण्याचे फवारे मारले जातात, हे येथील नेहमीचे दृश्य आहे. सुधीर गायधने, रहिवासी, सातारा.

येथील बांधकामे थांबवण्यासाठी दिलेली मुदत संपली असून उद्यापासून या भागात थेट कारवाई केली जाईल. टंचाईच्या अन्य कामांत व्यस्त असल्यामुळे दोन दिवस आम्ही व्यस्त होतो, पण उद्यापासून थेट कारवाई केली जाईल. जिल्हाधिकार्‍यांचे तसे आदेश आहेत. विजय राऊत, तहसीलदार, औरंगाबाद

उद्भवलेली परिस्थिती आणि जिल्हाधिकार्‍यांच्या सूचनेचा मान राखून आम्ही लगेच बांधकामे थांबवली. सातारा येथे 20 टक्केच कामे अधिकृत आहेत. 80 टक्के काम अवैध होती आणि ती आजही तशीच सुरू आहेत. अवैध बांधकामे फक्त उन्हाळ्यासाठी नव्हे तर ती कायमस्वरूपी थांबवावी, अशी आमची मागणी आहे. अवैध बांधकामांमुळे नियोजनबद्ध विकासाला खोडा बसतो, याकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसते. पापालाल गोयल, नूतन अध्यक्ष, क्रेडाई.

उलाढाल आणि रोजगारही कायम
बांधकामे थांबल्यास किमान 500 कोटींचे व्यवहार ठप्प होणार होते. परिणामी घरांच्या किमतीही वाढण्याची शक्यता होती. त्याचबरोबर किमान 30 हजार मजुरांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळण्याची शक्यता होती. प्रत्यक्षात यातील काहीही झालेले नाही. बेरोजगारी वाढू नये म्हणूनच बांधकामे थांबवण्यास जिल्हाधिकार्‍यांनी उशीर केला होता.