आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साताऱ्यातील काँक्रीट रस्त्याचे काम सुरू, डीबीस्टारने वृत्त प्रकाशित करताच कामाला लागला मुहूर्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - साताऱ्यातील रस्त्यावर केवळ खडी टाकून बंद पाडलेले काम ‘डीबी स्टार’च्या पाठपुराव्यानंतर सुरू करण्यात आले आहे. या व्हाइट टॉपिंग रस्त्यामुळे परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. लवकरच हे काम पूर्ण होणार आहे. यासंदर्भात १६ फेब्रुवारी २०१७ रोजी ‘आमदार निधी मिळाला मात्र, रस्त्याचे काम होईना’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. 
 
साताऱ्यातील आमदार रोडपासून ते ‘अप्रतिम पुष्प’कडे जाणाऱ्या या रस्त्याचे काँक्रिटीकरण सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केले जाणार होते. यासाठी आमदार निधीतून १३ लाख रुपये मंजूर करून हे काम एका ठेकेदाराला सोपवण्यात आले होते. जानेवारी महिन्यात या रस्त्याचे उपमहापौर स्मिता घोगरे यांच्या हस्ते उद्घाटनही करण्यात आले. संपूर्ण रस्त्याच्या लांबीत जाड खडी पसरवण्यात आली. मात्र, ठेकेदाराने कधी बांधकाम साहित्य नसल्याचे, तर कधी आचारसंहिता असल्याचे कारण पुढे करत काम थांबवले. 

गेल्या महिनाभरापासून रस्त्याचे काम होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले होते. या रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांची गैरसोय होत होती. ‘डीबी स्टार’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर ठेकेदाराने रस्त्याच्या कामास सुरुवात केली आहे. येत्या दोन दिवसांत ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. या कामाच्या क्युरिंगसाठी परिसरातील नागरिकांनीही पुढाकार घेतला आहे. लोकवर्गणीतून पैसे जमा करून खासगी टँकरद्वारे पाणी मारण्याची तयारी नागरिकांनी दर्शवली आहे.  व्हाइट टॉपिंग रस्त्याचे काम सुरू करण्यात आल्याने परिसरातील नागरिक आनंद व्यक्त करत आहेत. 

आमची गैरसोय दूर होईल 
आमची गैरसोय आता दूर होणार आहे. ‘डीबी स्टार’ चमूने वृत्त प्रकाशित केल्यानंतर यंत्रणेला जाग आली. अवघ्या चार दिवसांतच ठेकेदाराने कामास सुरुवात केली. आता या रस्त्याचे भाग्य उजळणार आहे. ठेकेदार, आमदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचेही आम्ही आभारी आहोत -  कवितारॉय चौधरी, मीना राजपूत, कालिंदी गाडेकर, मनीषा थोरात. 
बातम्या आणखी आहेत...