आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Filling The Road For Five Thousand Crore To 15 Crore May Not

पाच हजार कोटींचा कर भरणार्‍यांना रस्त्यासाठी 15 कोटीही मिळेनात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- वाळूज एमआयडीसीतून दरवर्षी पाच हजार कोटींपेक्षा अधिक कर राज्य, केंद्र सरकारकडे जमा होतो. मात्र या भागात 15 कोटींचा रस्ता तयार करणेही अवघड बनले आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी एमआयडीसीने आठ महिन्यांपूर्वी मुख्यालयाला प्रस्ताव पाठवला. त्याला अद्याप मान्यता मिळाली नाही. आठ दिवसांत रस्त्याचे काम सुरू न केल्यास मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अँग्रिकल्चरच्या (मसिआ) उद्योजकांनी निवेदनाद्वारे उपोषणाचा इशारा दिला.
वाळूजमधील ओअँसिस चौक, सिएट टायर आणि व्हेरॉक कंपनीपर्यंतचा 12 कि.मी.च्या चौपदरी मुख्य रस्त्याची चाळणी झाली आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मसिआ तीन वर्षांपासून पाठपुरावा करत आहे. रस्त्यासाठी जुलैमध्ये टेंडर काढण्यात आले. मात्र अद्याप त्याला मान्यता मिळाली नाही. रस्त्यावर मोठमोठे खड्डे असल्याने अनेकदा वाहतूक करताना मालाचे नुकसान होते. बहुतांश वेळा कंपन्या माल स्वीकारत नसल्याने उद्योजकांना त्याचा फटका बसत आहे. खराब रस्त्यामुळे वाळूजमधील दोन हजार लघु, 500 मध्यम आणि मोठे उद्योजक वैतागले आहेत.
प्रस्ताव मुख्यालयाकडे
या रस्त्याचे जूनमध्येच टेंडर काढून त्यासंबंधी मुख्यालयाला कळवले आहे. अद्याप रस्त्याच्या निधीसाठीची मान्यता मिळाली नाही. मान्यतेनंतर रस्त्याचे काम सुरू होईल. रस्त्यासाठी 15 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. राजेंद्र गावडे, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी.
परदेशातून आलेल्या उद्योजकांना उद्योग दाखवताना अक्षरश: लाज वाटते. खराब रस्त्यामुळे मालाचा पुरवठा करताना तो घासल्यामुळे त्याच्या दर्जावर परिणाम होतो. रस्त्यामुळे उद्योजकांना पॅकिंगसाठी वेगळा खर्च करावा लागत आहे. रणजितसिंह गुलाटी, माजी अध्यक्ष, मसिआ.
या रस्त्यावर सायकल, दुचाकीवरून अनेक कामगार जातात. त्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. ऑटो हब म्हणून ओळख असणार्‍या वाळूजमधील उद्योजक कर भरत असल्याने त्यांना रस्ता मिळावा. भारत मोतिंगे, सचिव, मसिआ.