आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After High Court Order, Municipal Corporation Not Complete Road Work

उच्च न्यायालयाच्या तंबीनंतरही, महापालिका रस्त्यांच्या कामे करण्‍याबाबत उदासिनच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - उच्च न्यायालयात मनपाने शपथपत्र दाखल केल्यानंतर 15 फेब्रुवारीला दहा रस्त्यांची कामे सुरू होणार अशीच सर्वांची अपेक्षा होती. मात्र डांबरीकरण की व्हाइट टॉपिंग आणि औरंगाबादचा ठेकेदार की पुण्याचा या वादात निविदा प्रक्रिया लांबली. त्यामुळे 15 फेब्रुवारीपूर्वी फक्त दोन रस्त्यांची कामे सुरू करण्याच्या हालचाली होत आहेत. यात सावरकर चौक ते सतीश मोटर्स आणि जळगाव रोड ते मध्यवर्ती जकात नाका या दोन अत्यंत खराब रस्त्यांचे नशीब फळफळणार आहे.


दरम्यान, पहिल्या टप्प्यातील 18 कोटींची कामे घेणार्‍या ठेकेदाराने 12 कोटींच्या दुसर्‍या टप्प्यात रस दाखवलेला नसून या संदर्भात मनपाचे अधिकारी, पदाधिकार्‍यांचे फोनही हा ठेकेदार उचलत नसल्याने सगळेच हैराण झाले आहेत.
पहिल्या टप्प्यात 18 कोटी रुपयांचे व्हाइट टॉपिंगचे दहा रस्ते होणार असून त्याची निविदाही निश्चित झाली आहे. पुण्याच्या जेपी एंटरप्रायजेस या ठेकेदाराने हे काम घेतले आहे. हे काम 15 तारखेच्या आत सुरू व्हावे असा मनपाचा प्रयत्न आहे. पण ठेकेदाराकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने मनपा घायकुतीला आली आहे.


18 कोटींच्या कामांपैकी काही कामे सुरू होणे आणि दुसर्‍या टप्प्याच्या कामांची निविदा घेण्यासाठी ठेकेदार येणे महत्त्वाचे आहे. मात्र, पहिल्या टप्प्याचे काम मिळूनही ठेकेदाराकडून हालचाल नाही. मनपाने करार प्रिंट आऊट काढून तयार आहे. ठेकेदाराने यावे, कामाच्या 2 टक्के रक्कम म्हणजे 37 लाख रुपये अनामत म्हणून जमा करायची, सहय़ा करून काम सुरू करावे अशी मनपाची अपेक्षा आहे. पण ठेकेदार यायला तयार नाही. येत्या दोन दिवसांत औपचारिकता पूर्ण करू असे ठेकेदाराने सांगितले. आता मनपा 15 तारखेच्या आसपास दोन रस्त्यांची कामे सुरू होतील या आशेवर आहे.


दोन रस्त्यांवर एक नजर
०जळगाव रोड ते मध्यवर्ती जकात नाका
०लांबी : सव्वा किलोमीटर
०येणारा खर्च : अडीच कोटी रुपये
०का खराब झाला? : 12 वर्षांत रस्त्यांचे काडीचे काम न झाल्याने वाटोळे झाले
सावरकर चौक ते सतीश मोटर्स
०लांबी : 700 मीटर्स
०येणारा खर्च : 2 कोटी
०का खराब झाला : वाहतूक अधिक, पाण्याचा निचरा नाही, दहा वर्षांत कामच नाही


दुस-या टप्प्यातील कामांसाठी ठेकेदार प्रतिसाद देईना
दुस-या टप्प्यातील 12 कोटींच्या कामांसाठी या ठेकेदाराने आणि त्याच्या स्पर्धकांपैकी एकानेही निविदा न भरल्याने सारेच हवालदिल आहेत. आतापर्यंत कामांसाठी ठेकेदार मिनतवा-या करत असत. आता अधिकारी, पदाधिका-यांना मिनतवा-या कराव्या लागत आहेत. जेपी एंटरप्रायजेसच्या ठेकेदाराला शहर अभियंता सखाराम पानझडे, सभापती नारायण कुचे फोन लावून थकले. निविदेला 14 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ठेकेदार पुढे आलेच नाहीत तर न्यायालयात विचारणा झाल्यावर मनपाची अडचण होणार आहे.


अभियंता म्हणाले, डोंट वरी, काम सुरू होईल
ठेकेदार प्रतिसाद देत नसताना काम कसे सुरू होईल, असे विचारले असता पानझडे म्हणाले, ‘डोंट वरी, उद्या ठेकेदार अनामत भरेल आणि नंतर औपचारिकता पूर्ण करून आम्ही लवकरच कामांचे उद्घाटन करणार आहोत. व्हाइट टॉपिंगचा अनुभव असलेले ठाणे मनपाचे शहर, कार्यकारी अभियंता पुढील आठवड्यात आमच्या अभियंत्यांची कार्यशाळा घेणार आहेत.’