आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रार नोंदवण्यासाठी महिला 12 तास पोलिस ठाण्यासमोर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- अपहरणानंतर लैंगिक शोषणाची तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेला मुकुंदवाडी ठाण्याच्या पोलिसांनी 12 तास तिष्ठत ठेवले. एवढेच नव्हे, तर एफआयआर न नोंदवताच वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. तेथेदेखील अधिकाऱ्यांनी तिला हाकलून दिल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. महिलांची तक्रार प्राधान्याने नोंदवून घ्या, असे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले असून त्यांच्या या आदेशाला बगल देण्याचे काम पोलिसांनी केले आहे.
29 ऑक्टोबर रोजी मुकुंदवाडी येथील ताराबाई (नाव बदलले आहे) हिचे रामनगरातून अपहरण करण्यात आले होते. तिच्यावर चौघांनी दहा दिवस अत्याचार केला. दहा दिवसांनंतर तिला औरंगाबादेत आणून सोडले. तिने सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला. ताराबाई आणि तिचे कुटुंबीय तक्रार नोंदवण्यासाठी मुकुंदवाडी ठाण्यात गेले. पोलिसांनी त्यांना सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत ठाण्यात बसवून ठेवले.
अपहरणकर्त्यांनी तिला पुण्याला नेले होते. दरम्यानच्या काळात तिच्या जवळचा मोबाइल आणि पैसे हिसकावून घेतले होते. तिला शुक्रवारी सिडको चौकात आणून सोडले. सिडकोतील कामगार चौकात ती रडत बसली होती. तिच्या ओळखीच्या व्यक्तीने तिला बघितले आणि तिचा मावसभाऊ प्रदीप (नाव बदलले) याला फोन करून सांगितले. तो काही मिनिटांतच चौकात आला आणि तिला घरी नेले. तिने घडलेला प्रकार आई, मावशी आणि भावाला सांगितला. त्यांनी तत्काळ मुकुंदवाडी पोलिस ठाणे गाठले. या प्रकरणात जबाब घेण्यासाठी महिला कर्मचारी लागते असे म्हणून त्यांना दुपारी एक वाजेपर्यंत बसवून ठेवले. त्यानंतर जबाब नोंदवण्यात आला. तिला संध्याकाळी सहाच्या दरम्यान आरोग्य तपासणीसाठी घाटीत पाठवण्यात आले.
वैद्यकीय अधिका-यावरही आरोप
घाटीतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आम्हाला अपमानित करून हाकलून दिले, असा आरोप पीडित महिलेचा भाऊ प्रदीपने "दिव्य मराठी'शी बोलताना केला.
म्हणे, नातेवाइक घाई करतात अशा प्रकारच्या गुन्ह्यात अनेक प्रक्रिया असतात. आयुक्तालयातून जबाब घेण्यासाठी खास महिला अधिकाऱ्यांना पाचारण करावे लागते. महिला दक्षता समितीलाही कळवावे लागते. या सगळ्या प्रक्रियेत बराच वेळ जातो. नातेवाइकांना याची माहिती नसते. ते घाई करतात, असे स्पष्टीकरण मुकुंदवाडी ठाण्याचे निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे यांनी दिले.

महिला आयोगाची सूचना असूनही...
अशा प्रकारणात तत्काळ गुन्हा नोंदवणे आवश्यक आहे. तशा विशेष सूचना महिला आयोगाने दिल्या आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखायला हवे. पीडित महिलेच्या मानसिकतेचा विचार होणे आवश्यक आहे. एक तक्रार नोंदवण्यासाठी एवढा वेळ लागणे योग्य नाही.
रेणुका पालवे, विधिज्ञ