आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पगार घेता, मग बहिष्कार कसा टाकता?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-आरोग्य सभापती मनीष दहिहंडे आणि पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बी. एस. नाईकवाडे यांच्यातील भांडणाच्या दुसर्‍या अध्यायात मंगळवारी अधिकार्‍यांनी स्थायी समितीवर बहिष्कार टाकला. त्यांच्या या पावलामुळे भडकलेल्या सभापती नारायण कुचे यांनी अधिकार्‍यांना बहिष्कार कसला टाकता? तुमची जबाबदारी आहे, पगार घेता ना? असे सुनावत वातावरण आणखीच चिघळवले. आचारसंहितेच्या तोंडावर कामे करून घेण्यासाठी घायकुतीला आलेल्या सत्ताधार्‍यांना अखेर माघार घ्यावी लागली व इतर पदाधिकार्‍यांसमोर दहिहंडे-डॉ. नाइकवाडे यांना शेकहँड करायला लावत हे प्रकरण तूर्तास मिटवण्यात आले.
सोमवारी अवैध कत्तल व कुत्र्यांच्या प्रश्‍नावरून काल दहिहंडे व नाईकवाडे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. पदाधिकार्‍यांनी दहिहंडे यांची व आयुक्तांनी नाईकवाडे यांची समजूत काढल्यावर प्रकरण संपल्यात जमा होते. पण धुम्मस सुरूच होती. मंगळवारी सकाळी मनपातील अधिकार्‍यांच्या संघटनेची बैठक झाली. त्यात दहिहंडे यांनी शिवीगाळ करण्याचा प्रकार गंभीर असल्याने आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्थायी समितीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेऊन सगळे अधिकारी हजर झाले. खूप दिवसांनंतर मनपातील सगळे अधिकारी एकाच वेळी हजर झाले. बहिष्काराचे पत्र द्यायला हे अधिकारी शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्या नेत्तृत्वाखाली सभापती नारायण कुचे यांच्या दालनात आले.
सभापती भडकले :
अँटी चेंबरमधील बैठकीत संतापलेल्या कुचे यांनी आपला राग या शिष्टमंडळावर काढला. बहिष्कार टाकल्याचे वाचताच ते संतापले. तुम्ही बहिष्कार टाकल्यावर कामे कशी होणार असा सवाल करीत दणादण सरबत्तीच त्यांनी सुरू केली. ‘एक बर्थ सर्टिफिकेट द्यायला आठ आठ दिवस चकरा मारायला लावता. तुमची काही जबाबदारी आहे की नाही? तुम्ही पगार घेत नाही का? मनपात कोणत्याही विभागात कधीही पाहा अधिकारी सापडत नाहीत. वर हे बहिष्कार टाकण्याचे प्रकार का करता? असले प्रकार करणार्‍या अधिकार्‍यावर मी कारवाई करायला लावेन. लोकप्रतिनिधी म्हणून आमचा काही हक्क आहे की नाही?’ त्यांच्या या सरबत्तीने अधिकारी अधिकच संतापले. त्यांनी नंतर आयुक्तांची भेट घेतली. आयुक्तांनी त्यांना महापौरांना भेटून घ्या असे सुचवले.
उपमहापौरांची शिष्टाई
अधिकारी महापौरांकडे जाण्याआधीच उपमहापौर संजय जोशी यांच्या दालनात उपमहापौर, सभागृह नेते सुशील खेडकर, अधिकारी संघटनेचे अध्यक्ष सखाराम पानझडे, नगरसेवक समीर राजूकर आदींनी बैठक घेत दहिहंडे व डॉ. नाईकवाडे यांना समजावून सांगण्यात आले. यापुढे दोघांनीही टोकाचे पाऊल उचलू नये असे या दोघांना सांगण्यात आले व नंतर त्यांना शेकहँड करायला लावून प्रकरण संपवण्यात आले.
स्थायीचे सभापती अधिकार्‍यांवर भडकले 0बैठकांच्या सत्रानंतर दहिहंडे, डॉ. नाईकवाडे प्रकरणावर पडदा