आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात वर्षांनंतर सफारी पार्कच्या जागेची मोजणी सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शासनाने सात वर्षांपूर्वी लष्कर आणि मनपाला एकाच वेळी शंभर-शंभर एकर मिटमिटा येथील जागा दिली होती. तीन वर्षांपूर्वी लष्कराने त्यांची जागा ताब्यात घेतली. मात्र मनपाकडून जागा हस्तांतर करण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू करण्यात आली आहे. या जागेवर मनपा सफारी पार्क उभारणार आहे.

मिटमिटा येथील सर्व्हे नंबर ३०७ वरील ४० हेक्टर (शंभर एकर) जागेत महानगर पालिकेचे सफारी पार्क उभारले जाणार आहे. गेल्या सात वर्षांपासून प्रस्तावित जागा हस्तांतरणाची प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिकेकडून करण्यात येत आहे. मात्र अद्यापही जागेचे हस्तांतरण झाले नसल्याने पार्कचे काम सुरू झाले नाही. विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी यात लक्ष घालून पालिकेला ही जागा हस्तांतरित करण्याचे आदेश तीन महिन्यांपूर्वी दिले होते. त्यानुसार जागा हस्तांतराची प्रक्रिया सुरू झाली. सोमवारी जागेच्या मोजणीचे काम नगर भू-मापन, महानगरपालिका आणि महसूल विभागाच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आले. सेंट्रल झू अॅथॉरिटीने प्राण्यांच्या हालचालींसाठी सिद्धार्थ उद्यानातील जागा कमी पडत असल्याने प्राणिसंग्रहालय हलवण्याची सूचना वारंवार केली आहे. तसेच प्राणिसंग्रहालयाची रचनाही चुकीची असल्याने प्राणिसंग्रहालय हलवा अथवा प्राणिसंग्रहालय उद्यान रद्द करण्याची नोटीसही महानगरपालिकेला बजावली होती. विभागीय आयुक्तांच्या सूचनेनंतर मनपा आणि महसूल दोन्ही विभागाने पाऊले उचलली आहेत.

डीपीआरही तयार : सफारी पार्कचा डीपीआर तयार करण्यात आला होता. तीन वर्षांपूर्वी त्यासाठी साडेतीनशे कोटी रुपये लागणार होते. आज त्याचा खर्च चारशे कोटींवर जाण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेने पार्क उभारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नगर विकास विभाग मंत्रालयाच्या उपसचिवांकडे २०१२ पूर्वीच प्रस्ताव पाठवला होता. त्यावेळी ८४ हेक्टरची मागणी होती. तसेच जागेसाठी दोन कोटी ९१ लाख ६० हजार रुपयांचा भरणा करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

तिजोरीत खडखडाट
मनपाच्यातिजोरीतील ठणठणाट असल्याने पैसे भरले जातील किंवा नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. तसेच सात वर्षांत जे झाले नाही ते तीन चार दिवसांत करण्याचा मानस मनपाने ठेवला आहे. यावरही किती जलद आणि कसे काम केले जाते, याचे उत्तर अनुत्तरित असले तरी आजपासून जागेची मोजणी प्रक्रिया सुरू झाली आहे असे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनीसांगतिले. या वेळी महापौर त्र्यंबक तुपे,अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, उद्यान अधीक्षक विजय पाटील यांचीही उपस्थिती होती.
बातम्या आणखी आहेत...