आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Three Years MP Raosaheb Danave Bagade Meet

तीन वर्षांनंतर खासदार रावसाहेब दानवे- बागडे यांचे मनोमिलन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिल्लोड - भाजपच्या नियमित घडामोडींपासून दूर ठेवण्यात येत असलेले माजी मंत्री हरिभाऊ बागडे यांना प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या निकटवर्तीयांनी प्रयत्न सुरू केले आहेत. तालुक्यात झालेल्या दोन सार्वजनिक कार्यक्रमांत त्यांचे नाव आवर्जून टाकण्यात आले. खासदार रावसाहेब दानवे यांचे पक्षात वर्चस्व निर्माण झाल्यापासून बागडेंना दोन हात दूर ठेवण्याची भूमिका मागच्या तीन वर्षांपासून घेण्यात येत होती.

भाजपचा मागील वीस वर्षांचा इतिहास पाहता औरंगाबाद जिल्ह्यातील पक्षाच्या कोणत्याही घडामोडीत हरिभाऊ बागडेंचा शब्द अंतिम मानला जाई. निवडणुकांची उमेदवारी असो, पक्षाचे पद असो किंवा एखाद्या कार्यक्रमाचे नियोजन, बागडे यांच्याशिवाय पान हलत नव्हते. त्यामुळे पक्षातील कोणतेही पद मिळवण्यासाठी त्यांच्या निकटवर्तीयांमध्ये समावेश असणे किंवा निकटवर्तीयांच्या वर्तुळात असले तरच कार्यकर्त्यांची वर्णी लागत असे. मागच्या काही वर्षांमध्ये ही परिस्थिती बदलली आहे. खासदार रावसाहेब दानवे यांचे पक्षातील वर्चस्व वाढत गेले. जालना लोकसभा मतदारसंघात औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, सोयगाव या दोन तालुक्यांचा समावेश होता, परंतु मागच्या पंचवार्षिकपासून फुलंब्री, औरंगाबाद व पैठण तालुक्याचा समावेश झाल्याने दानवेंचा संपर्क वाढला. लोकसभा निवडणुकीपर्यंत या जिल्ह्यात कार्यक्रमात एकत्र दिसणारे दानवे-बागडे जोडीमध्ये विधानसभा निवडणुकीतील बागडेंच्या पराभवानंतर अंतर वाढत गेले. नितीन गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर रावसाहेब दानवेंना अधिक बळ मिळाल्याने पक्षावरची पकड त्यांनी घट्ट केली.

फुलंब्रीचे आमदार कल्याण काळे यांचे विरोधक जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र साळुंके यांना व सिल्लोडचे माजी आमदार किसनराव काळे यांना त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात पुढच्या राजकीय वाटचालीचे आश्वासन देऊन भाजपात घेतले. वेळ येताच सुरेंद्र साळुंकेंना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष करून दिलेला शब्द पाळला. फुलंब्री मतदारसंघात सुरेंद्र साळुंके विधानसभेचे प्रबळ दावेदार मानले जातात. नुकत्याच झालेल्या औरंगाबाद महापालिकेत बागडेंच्या संमतीशिवाय संजय जोशींना दानवेंनी उपमहापौर केले, तर बापू घडामोडेंना औरंगाबाद शहर जिल्हाध्यक्ष व एकनाथ जाधवांना ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष केले. मागच्या तीन वर्षांत घडलेल्या सर्व घडामोडीत गेली अनेक वर्षे बागडेंना ज्येष्ठत्वाचा मान देणार्‍या दानवेंनी आपले र्शेष्ठत्व सिद्ध केले.

मागच्या काही काळात दोघांमध्ये फारसे बोलणेही नव्हते. परिणामी हरिभाऊ बागडेंच्या निकटवर्तीयांनी त्यांना प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून याची सुरुवात सिल्लोडपासून झाली आहे. मार्च महिन्यात केर्‍हाळा येथे व गुरुवारी धानोरा (तालुका सिल्लोड)येथे झालेल्या विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बागडे होते. अचानक सुरू झालेल्या बदलामुळे त्यांच्या निकटवर्तीयांमध्ये बागडे यांना पुन्हा सक्रिय करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.