आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Afzal Guru Hang Out Design Celebrate In Aurangabad

अफझलच्या फाशीचे शहरात जोरदार स्वागत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - 13 डिसेंबर 2001 रोजी संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार अफझल गुरूला शनिवारी (नऊ फेब्रुवारी) सकाळी फासावर लटकवण्यात आल्याचे समजताच शहरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भाजप व जनता युवा मोर्चाच्या वतीने सिडको बसस्थानक चौकात फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष केला. याप्रसंगी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

या वेळी शहराध्यक्ष भगवान घडामोडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कार्यक्रमात या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. घडामोडे म्हणाले, शंभर कोटी जनतेच्या भावना लक्षात घेऊन केंद्र सरकारने उशिरा का होईना हा निर्णय घेऊन चांगले काम केले आहे. मात्र, यापूर्वीच हा निर्णय झाला असता तर अधिक बरे झाले असते, असे ते म्हणाले.
पक्षाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा रेखा पाटील यांनीही भावना व्यक्त करत हा पाकिस्तानला दुष्कृत्य करण्याच्या परिणामाचा इशारा असल्याचे सांगितले. महाराष्ट्र सचिव अतुल सावे म्हणाले की, या निर्णयामुळे दहशतवादी कृत्य करणार्‍यांना जरब बसेल. अतिरेक्यांना वठणीवर आणण्यासाठी भारतीय संविधान सर्मथ आहे. मात्र, सरकारने अंमलबजावणी करण्याची गरज आहे. या वेळी माजी महापौर, डॉ. भागवत कराड, संघटनमंत्री प्रवीण घुगे, नगरसेवक अनिल मकरिये, नारायण कुच्चे, महेश माळवतकर, साधना सुरडकर, महिला शहराध्यक्षा मंगला गोसावी, दिलीप देशमुख, गोविंद केंद्रे, धनंजय कुलकर्णी, बालाजी मुंढे, मनोज भारस्कर, मिलिंद महाजन आदींसह मोठय़ा प्रमाणात कार्यकर्ते पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती

सैनिकांचे मनोधैर्य वाढेल
अफझल गुरू याला शिक्षा देण्यास सरकारने नऊ वर्षे लावली. उशिरा का होईना हा निर्णय घेतल्याबदल करोडो राष्ट्रभक्त जनतेसह मीसुद्धा स्वागत करतो. यामुळे भारत देशाकडे वाकड्या नजरेने बघण्याचे कोणीही धाडस करणार नाही. तसेच देशाची सुरक्षाव्यवस्था सांभाळणार्‍या सीमेवरील,सैनिकांचे मनोधैर्य वाढेल.संसदेच्या संरक्षणाकरिता ज्या सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन संसदेचे रक्षण केले त्या वीर जवानांच्या आत्म्यास शांती लाभेल.
खासदार रावसाहेब दानवे

संविधान अबाधित ठेवले
देशद्रोही अफझल गुरू यांस दिलेल्या फाशीचे पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय नेते, माजी मंत्री गंगाधर गाडे यांनी सर्मथन केले. फाशी देण्यास विलंब झाला असला तरी राज्यघटनेच्या तरतुदीनुसार त्याच्या विरुद्ध कारवाई करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान अबाधित ठेवण्याचे काम भारत सरकारने केले. त्या बद्दल सरकारचे अभिनंदन. अफझल गुरूसारखे आपल्या देशाविरुद्ध कारवाया करत असतील तर त्यांचाही खात्मा सरकारने करावा.
गंगाधर गाडे, माजी मंत्री

दिलासा देणारी फाशी
अफझल गुरूला कसाबपूर्वीच फाशी देणे अपेक्षित होते. प्रणव मुखर्जी राष्टपती झाल्यानंतर दोन्ही निर्णय राष्ट्राभिमानी जनसामान्यांना दिलासा देणारे घेतले. निर्णयप्रक्रिया कालबद्ध करण्यासाठी आवश्यक ते बदल सरकारने करावेत ही अपेक्षा. अफजल गुरूच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयाचे आपण स्वागत करतो.
अँड. प्रदीप देशमुख

फाशीचा निर्णय योग्यच
कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांना शिक्षा दिली गेली पाहिजे. तो कोणत्या जातीचा आहे यांची तमा वाळगायचे कारण नाही. आपण या शिक्षेचे सर्मथन करतो. यापुढेही देशाकडे वाकड्या नजरेने पाहणार्‍याविरुद्ध कठोर कारवाई झाली पाहिजे. सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे.
मौलाना अनिस

निर्णयाचे स्वागत
देशाकडे वाईट नजरेने पाहणार्‍या देशद्रोह्याला कठोर शिक्षा दिली गेली पाहिजे. देशात अतिरेकी कारवाया करणार्‍यांना माफी नको. कायदा सर्वासाठी समान आहे. अफझल गुरूला फाशी द्यायला उशीर झाला असला तरी निर्णय सवागतार्ह आहे.
डॉ. जफर अहेमद खान, विरोधी पक्षनेता

शिक्षा देण्यास विलंब
आपली न्याय संस्थेने निकाल देऊनही सरकारने अफझल गुरूला फाशी द्यायला उशीर लावला, देशाच्या संसदेवर हल्ला करणार्‍याविरुद्ध तातडीने कारवाई करायला पाहिजे होती. उशिरा का होईना चांगला निर्णय घेतला आहे. देशावर हल्ला करणार्‍या प्रत्येक देशद्रोहीस फाशी द्यायला हवी.
अहेमद पठाण,
जिल्हा सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस