आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलनांचा सर्वसामान्यांना फटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - महागाई भत्त्याची 35 महिन्यांची थकबाकी तातडीने द्यावी, केंद्राप्रमाणे बोनस देण्यात यावा, यासह विविध 11 मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या छत्राखाली राज्यातील 27 विभागांच्या संघटनांनी बुधवारी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत काम बंद आंदोलन केल्याचा फटका शहराबाहेरून कामासाठी आलेल्या नागरिकांना बसला. ज्यांच्याकडे काम आहे, तीच मंडळी निदर्शने करत असल्याने काहींनी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली, तर काहीजण दोन वाजेनंतर भेटू म्हणत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात रेंगाळले. हे आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवीदास जरारे अणि सरचिटणीस एन. एस. कांबळे यांनी केला असून सामान्यांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

या आंदोलनात राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत, महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष डी. एम. देशपांडे, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष एल. जी. गायकवाड, विष्णू लोखंडे, राज्य उपाध्यक्ष भाऊसाहेब पठाण, संजय महाळणकर, इंदुमती थोरात, बी. डी. म्हस्के, अशोक दराडे, काशीनाथ पेरकरवाड, चतुर्थर्शेणी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर लोधे, पोलिस कर्मचारी संघटनेचे शरद व्यापारी, जिल्हा कार्याध्यक्ष सुनील जाधव, वसंत मनोरकर, वैजनाथ विभुतेकर सहभागी झाले होते. याच मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने पंधरा दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. मात्र याची दखल शासनाने घेतली नाही. त्यामुळे आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून हे आंदोलन असून त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

या आहेत मागण्या
शासनाने कर्मचार्‍यांना बोनस, वाहतूक तसेच महागाई भत्ता देण्यात यावा, चतुर्थर्शेणी कर्मचारी संवर्गाचे खासगीकरण-कंत्राटीकरण तत्काळ बंद करावे, अनुकंपा तत्त्वावरील पदे भरून निवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यात यावे, सहाव्या वेतन आयोगानुसार महिला कर्मचार्‍यांना बालसंगोपन रजा मंजूर करण्यात यावी.

विक्रीकर कर्मचारी संघटना
विक्रीकर अधिकारी संघटनेचे विभागीय सहसचिव वाय. एच. मासूमदार, ज्योती गायसमुद्रे, पी. बी. जाधव, महाराष्ट्र विक्रीकर संघटनेचे विभागीय उपाध्यक्ष लालचंद जारडा, मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष सुभाष पळसकर, औरंगाबाद शाखा अध्यक्ष राजू मगर, सचिव सुरेश गायकवाड, महिला प्रतिनिधी आशा पवार, उपाध्यक्ष धनंजय बुगदानी, सहसचिव राजू पवार, कोशाध्यक्ष संतोष महेर, विक्रीकर चतुर्थर्शेणी कर्मचारी संघटनेचे राजू बेग, माधवसिंग बैनाडे यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले.

देवळाई रस्त्यासाठी आंदोलनाचा इशारा
देवळाई चौक ते देवळाई गाव रस्त्याच्या नूतनीकरण, डांबरीकरणाचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी हकीम पटेल मित्र मंडळाने केली आहे. या संदर्भात मंडळाच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, पावसामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. दररोज सुमारे 25 हजार वाहने या रस्त्यावरून ये-जा करतात. त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक दुचाकी, चारचाकी खड्डय़ांमुळेच मोडकळीस येत आहेत. किरकोळ अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. हे लक्षात घेऊन तत्काळ डांबरीकरण करावे, अन्यथा बांधकाम विभागाच्या विरोधात जोरदार आंदोलन केले जाईल. निवेदनावर हकीम पटेल, हरिभाऊ हिवाळे, महेश पडवळकर, अब्दुल पटेल, नदीम पटेल, विश्वनाथ जाधव, ताहेर पटेल, नजीर खान, जावेद पटेल, अबूशाम खान, मुजीब पटेल आदींच्या सह्या आहेत.