आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन म्हणजे उपकार नव्हे, प्रकाश आंबेडकर यांचे खडे बोल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - समाजासाठी आंदोलन करणार्‍या कार्यकर्त्यांनी उपकार करतो, या आविर्भावात रस्त्यावर उतरू नये. धर्म व पंथाच्या भानगडीत पडण्यापेक्षा प्रत्येकाशी आदराने वागल्यास पक्षाला फायदा होऊ शकतो, असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख अँड. प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादेतील मेळाव्यात केले.

तापडिया नाट्यमंदिरात बुधवारी (24 जुलै) मराठवाडास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ओबीसी संवर्गात मराठय़ांना आरक्षण देऊ नये यासाठी आंदोलन करा, तालुकास्तरावरील महाविद्यालयांत जा, पक्षाची भूमिका समजावून सांगा, नसता ‘आता नाही तर कधी नाही’ अशी वेळ येईल, असे आवाहन आंबेडकर यांनी केले. ओबीसींप्रमाणे एससी आणि एनटीलाही क्रिमीलेअरची अट लागू झाली पाहिजे. शिष्यवृत्तीसाठी आंदोलन करण्याची गरज आहे. महिला आघाडी मजबूत करण्यासाठी तालुकास्तरावरील कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागले पाहिजे, असेही ते म्हणाले.

इतर पक्षांतील नेते समाज लक्षात ठेवून भांडत नाहीत. ते केवळ पक्षाच्या ध्येयधोरणासाठीच कामे करतात, असा आरोप करत त्यांनी आपला पक्ष नीतिमूल्ये जपणारा पक्ष असला पाहिजे, असे मत व्यक्त केले. कोणतेही आंदोलन मनापासून करा, इतरांना मान-सन्मान द्या, उपकाराची भाषा वापरू नका, माणुसकीने एकमेकांचा आदर करा, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. तुम्हाला प्रशिक्षणाची गरज असल्यास राजगृहावर संपर्क साधा, त्याची व्यवस्था केली जाईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला ते केवळ हिंदू कोड बिलामुळेच, यांची माहिती दिली जाते. मात्र, त्यांच्या राजीनाम्यात ओबीसी बिल मंजूर करत नसल्याचाही उल्लेख केला होता. बहुजनांसाठी मंत्रिपद सोडले. पंडित नेहरूंना याबाबत त्यांनी सांगितले होते, असे मतही त्यांनी या वेळी व्यक्त केले. या मेळाव्याला रमेशभाई खंडागळे, प्रा.वाल्मीक सरोदे, अँड. वैशाली चांदणे, नगरसेवक अमित भुईगळ, गौतम लांडगे, राम पेरकर, वसंतराव साळवे, महेंद्र सोनवणे, यांची प्रमुख उपस्थिती होती.


भूमिका समजून घ्या.
पक्षाची नेमकी भूमिका समजावून काम करा. समाजात मिसळा. कीर्तनकारांना भेटा, त्यांना तुमची भूमिका समजावून सांगा. लोक समजतील आणि नंतरच आंदोलनात येतील, असे मतही आंबेडकर यांनी या वेळी व्यक्त केले.

राजकारणात स्वाभिमानाने वागा
मेळाव्यात प्रा. अविनाश डोळस यांनी शरद पवारांचा अनुभव सांगत निवडणुकीत वर्धा ते अकोला या भागात काँग्रेसचे उमेदवार निवडणुकीत पराभूत झाले. तेव्हा पवार यांनी बाळासाहेबांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा ‘तुम्ही बारामतीला या, असे सांगितले होते. मात्र, बाळासाहेबांनी पवारांना राजगृहावर बोलावले. पवार राजगृहावर आले. हा स्वाभिमान बाळासाहेबांमध्ये आहे, असे डोळस यांनी सांगितले.