आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोजापूर धरणाच्या पाण्यासाठी कर्‍हे फाट्यावर रास्ता रोको

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर - पूर्ण क्षमतेने भरलेल्या भोजापूर (ता. सिन्नर, जि. नाशिक) धरणातील पाणी तळेगाव गटासाठी चार्‍यांना सोडण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेना शुक्रवारी रस्त्यावर उतरली. महामार्गावरील कर्‍हे फाट्यावर शुक्रवारी सकाळी केलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे दोन तासांहून अधिक वेळ घाटातील वाहतूक ठप्प झाली होती.

शिवसेना तालुकाप्रमुख बाबासाहेब कुटे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या या आंदोलनामुळे या भागातील शिवसेना कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण झाले आहे. पाण्याच्या न्याय हक्कासाठी लढा देण्याचा निर्धार करण्यात यावेळी कार्यकर्त्यांकडून आला. धरणातील 35 टक्के पाण्यावर या भागाचा हक्क असताना सुद्धा हक्काचे पाणी देण्यासाठी टाळाटाळ होत असल्याने तळेगाव भागातील शेतकरी संतप्त झाले आहेत. धरण भरल्यानंतर सुद्धा थेंबभर पाणी मिळू न शकल्याने कुटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शिवसैनिकांसह या भागातील ग्रामस्थ सहभागी झाले होते. पाणी न मिळण्यासाठी सत्ताधार्‍यांचे शेतकरी विरोधी धोरण कारणीभूत असल्याचा आरोप यावेळी शिवसेनेकडून करण्यात आला.

पंधरा दिवसांपूर्वी धरण भरल्यानंतर ओव्हरफ्लोचे पाणी म्हाळुंगी नदीपात्रात सोडण्यात आल्याने तालुक्यातील चिकणी, निमगाव परिसराला त्याचा काही प्रमाणात फायदा झाला आहे. त्या भागातील केटीवेअर भरून घेण्यात आले. मात्र, तळेगाव भाग यापासून वंचित राहिल्याने आक्रमक झालेल्या शिवसेनेने शुक्रवारी आंदोलन केले. तळेगावसाठी पाणी सोडल्यास या भागातील पाझर तलाव भरून घेतले जाऊ शकतात. आंदोलनात उपतालुकाप्रमुख संदीप सांगळे, माजी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत घुगे, सोनेवाडीचे उपसरपंच पांडुरंग गोमासे, शिवसेना शहरप्रमुख अमर कतारी, संजय फड, अमोल कवडे, समीर ओझा, शरद पावबाके, महेश वालझाडे आदींचा समावेश होता. नायब तहसीलदार अमोल मोरे व पाटबंधारे खात्याच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.