आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्यासाठी वाजवल्या पिपाण्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - ‘मनपा पदाधिकारी, नगरसेवक, अधिकार्‍यांनो, जागे व्हा, जायकवाडीच्या पाण्यासाठी सुरू केलेल्या लढय़ात सहभागी व्हा,’ असे आवाहन करीत जायकवाडी पाणी संघर्ष कृती समितीच्या सदस्यांनी मनपा मुख्यालयाचा परिसर पिपाण्या वाजवून दणाणून सोडला. 17 सप्टेंबरच्या आत जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यात आले नाही तर पालकमंत्र्यांना ध्वजवंदन करू देणार नाही, असा खणखणीत इशाराही या आंदोलकांनी दिला.

कृती समितीच्या वतीने शुक्रवारी मनपासमोर पिपाणी आंदोलन करण्यात आले. यात शिवसेना वगळता सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते सहभागी झाले होते. समितीचे निमंत्रक जयाजीराव सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात सहभागींनी जोरदार पिपाण्या फुंकल्या. सुमारे अर्धा तास हा दणदणाट सुरू होता. यानंतर कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांना निवेदन देण्यात आले.

जयाजीराव सूर्यवंशी म्हणाले की, समन्यायी पाणीवाटप न झाल्याने जायकवाडीत आज फक्त 23 टीएमसी पाणी आहे. त्यामुळे ही समस्या गंभीर असून शहरात आजच दोन दिवसांआड पाणी मिळत आहे. हा कालावधी काही काळानंतर वाढणार आहे. याकडे मनपा प्रशासन, पदाधिकारी, नगरसेवक गांभीर्याने पाहत नसल्याने आगामी काळात मोठे संकट येणार आहे. मराठवाड्याला, औरंगाबादला हक्काचे पाणी मिळावे यासाठी झोपेचे सोंग घेतलेल्या नगरसेवकांना जागे करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे.

मराठवाडा मुक्तिदिनापूर्वी जायकवाडीत वरच्या धरणांतून पाणी सोडले गेले नाही तर पालकमंत्र्यांना 17 सप्टेंबर रोजी ध्वजवंदन करू देणार नाही, असा इशारा देत सूर्यवंशी म्हणाले की, त्याच दिवशी पाण्याच्या मागणीसाठी क्रांती चौकातून विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा नेला जाणार आहे.

सर्वपक्षीय सदस्य उपस्थित
या आंदोलनात भाजपचे संजय केणेकर, संजय चौधरी, कैलास गायकवाड, मनसेचे राज वानखेडे, बाळासाहेब सराटे, गोपीनाथ वाघ, अँड. लक्ष्मण पाटील प्रधान, शेख चांद पटेल, अशोक बन्सवाल, सतनामसिंग गुलाटी, उद्धव भवलकर, सुमीत खांबेकर, राजकुमार दिवेकर, संपत रोडगे, उस्मान बेग, लक्ष्मण साक्रुडकर, प्रा. परशुराम वाखुरे, बुद्धप्रिय कबीर, अश्फाक सलामी यांची उपस्थिती होती.