आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलनकर्त्या युवकांना देणार 'योजनां'चे धडे, युवक काँग्रेसचे शिबिर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कोणत्याही राजकीय पक्षाची युवक आघाडी म्हणजे आंदोलनात सहभाग, घोषणाबाजी, फारच झाले तर युवकांच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना निवेदन असे स्वरूप असते. त्यात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना तर अनेक वर्षे सत्तेत असल्याने आंदोलन करण्याचीही संधी नव्हती. मग नेतृत्व विकास, माहितीचा अधिकार, आधुनिक तंत्रज्ञान, शासकीय योजनांतील बारकावे आदींचा प्रश्नच नव्हता. मात्र, सत्तेच्या सोपानावरून उतरल्याने ही संधी त्यांना मिळाली आहे. तिचा फायदा घेत त्यांनी १२ जानेवारी रोजी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे केवळ भाषणबाजी करता सर्व मार्गदर्शक पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन करणार आहेत.
युवक म्हणजे मोठी शक्ती असे सर्वच नेते सांगत असतात. युवकांसाठी कार्यक्रमही जाहीर होतात. अर्थात त्यांचे स्वरूप रक्तदान शिबिर, वह्या किंवा फळे वाटप अथवा एखादे छोटे-मोठे आंदोलन असेच असते. युवक काँग्रेसने या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचे ठरवले असून प्रत्येक मतदारसंघात प्रशिक्षण शिबिरे होणार आहेत.

आज पहिला प्रयोग
पहिलाप्रयोग राष्ट्रीय युवा दिनानिमित्त म्हणजे १२ जानेवारीला सकाळी ११.३० ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत गांधी भवन, शहागंज येथे होणार आहे. अर्थात यात काँग्रेसची अवस्था एवढी बिकट का झाली, याबाबतही विचार मंथन केले जाणार आहे.

हॉलमार्क इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा. डॉ. अब्दुल्ला अलजिलानी युवक नेतृत्व संभाषण कौशल्य, तर डॉ. पवन डोंगरे माहितीच्या अधिकारावर सादरीकरण करणार आहेत. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना गोरगरिबांपर्यंत कशी पोहोचवता येऊ शकते, याची माहिती डॉ. योगेश लोखंडे देणार आहेत. खालेद पठाण युवक काँग्रेसची ध्येये उद्दिष्टे सांगणार असून काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र दाते पाटील सद्य:स्थितीमध्ये काँग्रेस का आली? याबद्दल भूमिका मांडणार आहेत. लियाकत पठाण यांनी राष्ट्रीय युवा दिन युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजित कदम यांच्या ३६ व्या वाढदिवसानिमित्त हे शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरामुळे सादरीकरणामुळे काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांना आपलेही नव्या तंत्रज्ञानात अस्तित्व आहे, याची जाणीव होईल.