आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अग्निपथ’ची जादू चालणार?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - नाम विजय दीनानाथ चौहान...हवा बहोत तेज है... या डायलॉगने अमिताभ बच्चन यांना अ‍ॅग्री यंग मॅनची नवी ओळख दिली. या चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीत नवा ट्रेंड आणला होता. जुन्या चित्रपटांची लोकप्रियता पाहता बॉलीवूडमध्ये रिमेकचा धडाका सुरू आहे. याच पठडीतील हृतिक रोशनचा ‘अग्निपथ’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
नवा ‘अग्निपथ’ पूर्णपणे जुन्यासारखा नसल्याचा दावा निर्माता करण जोहर याने केला असला तरी आगीच्या ज्वाळांतून पळणा-या हृतिकला पाहून जुन्या आठवणी जाग्या होतात. आजवर विविध दर्जेदार भूमिका ताकदीने साकारलेल्या हृतिकला अमिताभच्या भूमिकेचे शिवधनुष्य पेलले की नाही ते येणारा शुक्रवार ठरवेल. या चित्रपटातील ‘चिकनी चमेली’ हे गाणे सर्वत्र धूम करत आहे. या ‘चिकनी चमेली’ला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक उत्सुक आहेत.
यात प्रियंका चोप्राची प्रमुख भूमिका आहे. हृतिकसह प्रियंकाही यानिमित्ताने नशीब आजमावणार आहे. शाहरुख खानने अमिताभच्या ‘डॉन’ चित्रपटाचा रिमेक आणि सिक्वेल केला. चित्रपटातील शाहरुखच्या भूमिकेला फारशी वाहवा मिळाली नाही तरी महानायकाच्या चित्रपटाचा रिमेक म्हणून अमिताभच्या अनेक चाहत्यांनी चित्रपटगृहांमध्ये गर्दी केली होती. ‘अग्निपथ’ही अशीच गर्दी खेचेल अशी अपेक्षा आहे. शहरातील सर्व मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांमध्ये चित्रपट शुक्रवारी झळकणार आहे. विविध महाविद्यालयीन तरुण-तरुणींनी चित्रपटाला जाण्याचा प्लॅन आधीच आखून ठेवलेला आहे. मात्र नव्या पिढीसोबतच जुन्या पिढीतील प्रेक्षकही ‘अग्निपथ’च्या प्रतीक्षेत आहेत.
दिग्दर्शक : करण मल्होत्रा
निर्माता : हिरो यश जोहर, करण जोहर
संगीतकार : अजय-अतुल
कलावंत : हृतिक रोशन (विजय दीनानाथ चौहान), प्रियंका चोप्रा (मेरी मॅथ्यू), संजय दत्त (कांचा चिना), ऋषी कपूर (रऊफ लाला), कतरिना कैफ (पाहुणी कलाकार), ओम पुरी, झरीना वहाब, चेतन पंडित, सचिन खेडेकर, राजेश टंडन
मराठी संगीतकार - ‘अग्निपथ’चे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच मोठ्या बॅनरच्या चित्रपटाला अजय-अतुल या मराठी चित्रपटसृष्टीत धूम करणा-या संगीतकारांनी संगीत दिले आहे. विशेष म्हणजे मराठीतील ‘कोंबडी पळाली’ हे गाणे हिंदीत ‘चिकनी चमेली’ नावाने आले असून ते प्रदर्शनापूर्वीच तुफान लोकप्रिय ठरले आहे.