आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Agricultural Produce Market Committee,latest News In Divya Marathi

साफसफाईच्या नावाखाली बाजार समितीत भ्रष्ट्राचार ? अस्वच्छता, दुर्गंधी; तरीही सफाईवर होतो लाखोंचा खर्च

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जाधववाडी येथील बाजार समितीच्या खुल्या आवारात चहुबाजूने अस्वच्छता पसरली आहे. मोकाट गुरे, शेळ्या शेतकऱ्यांचे धान्य फस्त करत आहेत. लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या शौचालयाची भग्नावस्ता झाली असून त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. याचा दररोज शेतकरी, व्यापारी, हमाल, माथाडी व भाजीपाला खरेदी करण्यास येणाऱ्या 40 ते 50हजार ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, साफसफाईच्या नावाखाली दरवर्षी लाखो रुपयांची केवळ सफाईच सुरू असल्याचा आरोप शेतकरी, व्यापा-यांनी केला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालकीची 73.28 हेक्टर जागा आहे. यापैकी बहुतांश जागा पडीक आहे. तेथे अतिक्रमण, वाहनांची पार्किंग, गुरे चरण्याचे ठिकाण झाले आहे. तसेच मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. फळे भाजीपाला मार्केटमध्ये फळभाज्या विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना नाइलाजाने अशाच जागेवर बसून व्यापार करावा लागतो.800 गाळ्याच्या आजूबाजूला घाण पसरलेली आहे. पाच लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च करून बांधलेल्या शौचालयाची अवस्था वाईट झाली. तसेच रस्त्यातदेखील खड्डे पडल्याने शेतमाल घेऊन येणारे शेतकरी व भाजीपाला खरेदी करण्यासाठी आलेल्या किरकोळ व्यापारी, ग्राहकांना याचा फटका बसत आहे. विकासाच्या नावाखाली समिती दरवर्षी जेवढे उत्पन्न मिळते तेवढे खर्च करते. त्यातच गत चार वर्षांत ३ लाख ३३ हजारांनी खर्च वाढवण्यात आला. मात्र, सुविधेत कोणतीही वाढ झालेली नाही.
पैशांची सफाई नको
जिल्ह्याच्या सर्वात मोठ्या बाजारपेठेत स्वच्छतेचा व विकासाचा बोजवारा उडाला आहे. पावसाळ्यात चिखलात फळभाज्या, धान्य विक्री करावी लागते. बाजार समितीत प्रवेश करण्यासाठी धड रस्ते नाहीत. मोकाट जनावरे शेतकऱ्यांचे धान्य फस्त करून टाकत आहे. दुसरीकडे कागदावर लाखो रुपये खर्च केल्याचे दाखवले जाते. पैशांची सफाई तत्काळ थांबवा.
नाना पळसकर, शेतकरी, रा. पळशी. ता. औरंगाबाद.

कायापालट होईल
पडीक जागा असल्यामुळे लोक तेथे कचरा टाकतात. संरक्षक भिंत नसल्याने मोकाट जनावरे येतात. या सर्व समस्या सोडवण्यासाठी विकास आराखडा तयार केला आहे. त्यानुसार सर्व कामे केली जाणार आहे. काही लोक विनाकारण आरोप करत असतात. त्यात काही तथ्य नाही. नानासाहेब आधाने, सचिव. जिकृउबास.