आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Agriculture Ministers Position Will Decision To CM Khadse

स्वतंत्र कृषिमंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, महसूलमंत्री एकनाथ खडसे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- राज्यासाठी स्वतंत्र कृषिमंत्री असावा की नाही, हा कार्यक्षमतेचा विषय आहे. या खात्यासाठी जास्त वेळ दिला पाहिजे. तसा प्रयत्नही आम्ही करत आहोत. मात्र योग्य वेळी त्याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेऊ शकतात, असे मत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे. दुष्काळ पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकासोबतच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची चर्चा सुरू आहे. तेव्हा विस्तार केव्हा होणार, या प्रश्नावर ते म्हणाले की, तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही तेच सांगू शकतील, असे सांगून त्यांनी या विषयावर बोलणे टाळले. मात्र या विस्तारात त्यांच्याकडील खाते जाणार काय, स्वतंत्र कृषिमंत्रिपद दिले जाणार का, या प्रश्नावर खडसे यांनी हा कार्यक्षमतेचा विषय आहे, असे सांगितले. मात्र मुख्यमंत्री योग्य वेळी निर्णय घेऊ शकतात, या त्यांच्या उत्तरामुळे त्यांच्याकडील खाते कमी होणार का, यावर चर्चा सुरू झाली.

वनविभागाच्या माध्यमातून चारा उपलब्ध : राज्यसरकारने चाऱ्याच्या उपलब्धतेसाठी आतापर्यंत दहा कोटी रुपये खर्च केले आहेत. हायड्रोफोनिक यंत्रणेच्या माध्यमातून ५० टक्के सबसिडी देण्यात येत आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच वन विभागदेखील चाऱ्याची विक्री करत असते. याबाबत आम्ही वन विभागालादेखील सूचना दिल्या असून त्यांच्याकडूनही चारा खरेदी करून दुष्काळग्रस्त भागाला देण्यात येईल, असे खडसे यांनी सांगितले.
तसेच जमीन महसुलात राज्य सरकारने सूट दिली असली तरी शेतकऱ्यांच्या स्थानिक करात सूट द्यायची असेल तर जिल्हा परिषदेने तसा ठराव करून दिला पाहिजे. तसा प्रस्ताव दिल्यास राज्य सरकार ती सूट देईल, असे खडसे यांनी सांगितले.

नाडी बघूनच इलाज
केंद्रीयपथकाच्या दुष्काळ पाहणीवर अनेक वाद निर्माण होत आहेत. त्यावर समाधानी आहात का, असे खडसे यांना विचारले असता ते म्हणाले, दुष्काळाची तीव्रता पथकाच्या लक्षात आली आहे. सर्वच ठिकाणी जाणे शक्य नाही. डॉक्टर नाडी बघून इलाज सुरू करतात. सर्व तपासण्या करत बसले तर पेशंट मरेेल. या पाहणीबाबत मी समाधानी आहे.