आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Agriculture News In Marathi, 15 Crore For Corn Hub, Divya Marathi

मका हबसाठी 15 कोटी देणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एअर कार्गो हबच्या निर्मितीसाठी उद्योजकांनी पुढाकार घ्यावा -एमआयटीमधील अन्नप्रक्रिया प्रदर्शनात पाहणी करताना कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील.
जिल्ह्यात मक्याचे एक लाख 30 हजार हेक्टर क्षेत्र आहे. हे उत्पादन साठवण्यासाठी सोय नाही. येथे मका हब तयार व्हावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे. कृषी खात्याची कोट्यवधीची जमीनदेखील त्यासाठी उपलब्ध करून देण्यात येईल. उद्योजकांनी यासाठी पुढाकार घ्यावा, एका दिवसात त्यांना 15 कोटींचा निधी मंजूर करून देण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉर्मस अँड अँग्रिकल्चर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉर्मस, सीएमआयए, मसिआ, औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ, आंबा उत्पादक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने एमआयटी महाविद्यालयात आयोजित अन्नप्रक्रिया परिषद व प्रदर्शनाचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी ते म्हणाले, मूल्यवर्धित शेतीकडे जाण्याची धडपड आणि परिवर्तनाचे आकर्षण असतानाही शेतीत उत्पन्न वाढावे यासाठी शासनाने कुठलेही ठोस पाऊल उचलले नाही. अनुदानाच्या संस्कृतीभोवती सर्व प्रक्रिया फिरते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. पुढे ते म्हणाले, शेती क्षेत्रासाठी खासगी क्षेत्रात जे संशोधन सुरू आहे त्यातही विसंगती दिसून येते. कंपन्या संकरितचा पुरस्कार करत आहेत. मात्र, ग्राहकांना जैविक उत्पादन खरेदी करण्यात रस आहे. त्यासाठी ते कुठलेही शुल्क मोजायला तयार आहेत. अनटचेबल मिल्क सारखे अनोखे उपक्रम देशातील मोठय़ा शहरात राबवले जात आहे. त्याला ग्राहकांचा प्रतिसाद मिळतो आहे.
जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर फळ, भाजीपाला आणि पिकांची निर्मिती होते. प्रत्येक शेतकर्‍याला वाटते आपला माल विमानाने परदेशात जावा, सुदैवाने औरंगाबादेत तशी सोय आहे. औरंगाबाद विमानतळावर एअर कार्गो हब तयार व्हावे यासाठी मी गेल्या दोन वर्षांपासून विमानतळ प्राधिकरणाशी चर्चा करत आहे. या प्रकल्पासाठीदेखील उद्योजकांनी पुढाकार घ्यावा. यामुळे स्थनिक शेतकर्‍यांना आंतराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते, असे मत पाटील यांनी व्यक्त केले. या वेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉर्मस इंडस्ट्री अँड अँग्रिकल्चरचे अध्यक्ष राम भोगले, महाराष्ट्र शासनाच्या कृषि व पणन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल, महिको सीड्सचे राजू बारवाले, नाथ ग्रुपचे नंदकिशोर कागलीवाल, नॅच्युरल ग्रुपचे संचालक जी. बी. ठोंबरे, मिलिंद कंक, आदेशपालसिंग छाबडा, कल्याण बरकसे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक राम भोगले यांनी केले. तर शंतनू भडकमकर यांनी आभार मानले.