औरंगाबाद- कृषीखात्यात कृषी सहायक असल्याचे सांगून शहरातील ५०० महिलांना महिलेनेच फसवल्याचा प्रकार उजेडात आला. २६ जुलै रोजी या तोतया महिला अधिकाऱ्याला सिटीचौक पोलिसांनी अटक केली असून न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. सुरेखा काथार (३०, रा. फुलंब्री) असे या महिलेचे नाव आहे.
सुरेखा काथार हिने हर्षनगर भागात राहणारी तिची बहीण इंदू नरवडे हिचा आधार घेत महिलांशी ओळख वाढवली. आमच्या खात्यामार्फत अनेक योजना राबवल्या जात असून त्याचा लाभ तुम्हाला घेता येईल. याशिवाय आमच्या खात्यात कर्मचाऱ्यांचा इन्कम टॅक्स कपात होतो तो वाचवण्यासाठी आमच्या संस्थेकडून तुम्हाला प्रत्येकीला पाच हजार रुपये देण्यात येतील, असे या आरोपी महिलेने अन्य महिलांना अामिष दाखवले. एवढेच नाही तर शहरातील विविध भागांत एजंट नेमून प्रत्येक महिलांकडून १०० रुपये जमा केले. एका एजंटने किमान ५० महिलांकडून पैसे जमा केले. अशाप्रकारे सुमारे अडीच लाख रुपये जमा झाले. या शिवाय तुमच्या नवऱ्याला कृषी खात्यात नोकरी लावून देतो, असे सांगत दोन महिलांकडून ५० हजार रुपये उकळले.
फसवणूक झालेल्या महिलांनी मंगळवारी पोलिस आयुक्तांची भेट घेण्यासाठी सुलभा गोफणे, पुष्पा करमाडकर, मंगला गंगावणे, विमल गायकवाड, सुनीता बनसोडे, माधुरी कांबळे, राजमाला साळवे, रंजना साळवे या आयुक्तालयात आल्या होत्या. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक मधुकर साळवे करत आहेत. फसवणूक झालेल्या महिलांनी पोलिस आयुक्तालयात धाव घेतली.
काय घ्यायला हवी काळजी ...
अशाप्रकारे कोणीही सरकारी योजना सांगितली असता संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून योजनेची खात्री करून घ्यावी. आपल्याकडे आलेल्या अधिकाऱ्याला त्याचे ओळखपत्र मागावे. आपल्या महत्त्वाच्या कागदपत्रांची सत्यप्रत कोणालाही देऊ नये.
दिलेला धनादेशही बँकेत वटला नाही
यामहिलेने डिसेंबर २०१४ पासून हा प्रकार सुरू केला होता. १०० रुपये भरल्यानंतर घरातील मुलांच्या लग्नासाठी ५० हजार देण्यात येतील, असे सांगून पुन्हा काही महिलांकडून हजार रुपये घेतले. कोणालाही लाभ मिळाला नाही म्हणून काही महिलांना संशय आला. त्यांनी पैशासाठी तगादा लावल्यानंतर आरोपी महिलेने प्रेरणा नागरी सहकारी बँकेचा ५० हजार रुपयांचा चेक दिला. मात्र तो वटला नाही.