आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवक कमी झाल्याने हमाल मापाडीही दुष्काळाच्या गर्तेत!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - मराठवाड्यात सर्वाधिक आर्थिक उलाढाल होणाऱ्या बाजार समित्यांत जालना शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे नाव आवर्जून घेतले जाते. मात्र, सतत तीन वर्षांपासून पडत असलेल्या दुष्काळामुळे या बाजार समितीत मालाची आवक यंदा ५० टक्क्यांवर येऊन ठेपली आहे. बाजार समितीतील दुष्काळाचा फटका हमाल, मापाड्यांनाही सहन करावा लागत असून एरवी ५०० रुपये कमविणाऱ्या हमालांना सध्या ५० रुपये रोजंदारीवर काम करण्याची वेळ आली आहेत.

कृषी उत्पन्न बाजारपेठेत गहू, ज्वारी, मका, सोयाबीन, तूर आदी पिकांची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. यामुळे शहरातील इतरही व्यवसाय तेजीत असतात. मात्र, सध्या तीन वर्षापासून होत असलेल्या अत्यल्प पावसामुळे शेतीमालाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे दिसून येत आहे. या उत्पादनात घट झाल्याने पर्यायाने कृषी उत्पन्न बाजार समितीत होणाऱ्या मालाची आवक निम्म्याने कमी झाली आहे. त्यामुळे ग्रामीण शहरी अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असून किराणा मार्केट, कपडा बाजारपेठ, कृषी सेवा केंद्र, सराफा व्यापारपेठ यासोबत इतर व्यवसायांना त्याचा फटका बसला आहे. यावर्षी जून महिन्याच्या प्रारंभी समाधानकारक पाऊस झाला. यामुळे बाजारपेठेत चांगली खरेदी, विक्री वाढून बाजारपेठेत चांगले वातावरण निर्माण झाले होते. मात्र, जूनच्या १५ तारखेपासून पावसाने हुलकावणी दिली आहे. यामुळे एकप्रकारे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. बाजार समितीतील उलाढाल कमी झाल्याने येथे काम करणाऱ्या हमाल, मापाडीही अडचणीत आले आहेत. समितीतील मालाच्या आवक-जावकवर अवलंबून असलेल्या हमाल, मापाडी यांच्यावरही आर्थिक अरिष्ट आले आहे.
हमाल, मापाड्यांचे काम थंडावले
बाजारपेठेतमालाची आवक झाल्यानंतर वाहनातून उतरविणे अथवा दुकानातून वाहनात माल टाकण्याचे काम हमालांकडून करून घेतले जाते, तर मापाड्यांकडून धान्याची मोजमापसहित कामे करून घेतली जातात. या कामांमधून कामगारांना दिवसभरातून ५०० रुपये रोजंदारी मिळते. मात्र, सध्या बाजारपेठेत मालाची आवक गतवर्षीपेक्षा ५० टक्क्यावरच आल्यामुळे ५० ते १०० रुपयांपर्यंतही रोजंदारी निघणे मुश्कील झाले आहे.

बाजार समितीची वर्षनिहाय आवक
वर्षेमहिना आवक (क्विंटलमध्ये)
२०१३ मे ४६ हजार ९५७ क्विंटल
२०१३ जून ४२ हजार ७८० क्विंटल
२०१४ मे लाख ५६ हजार ९४७ क्विं.
२०१४ जून ९२ हजार ६८० क्विंटल
२०१५ मे ७६ हजार ६४७ क्विंटल
२०१५ जून ५४ हजार ५८५ क्विंटल

५० - टक्क्यांवर आली मालाची आवक
४२ - ते ४६ गावातील हमाल येतात कामासाठी
२०० - हमाल, मापाडी रोजंदारीवर
६१७ - हमाल, मापाडींची संख्या

ग्रामस्थांची गुजराण : हमालआणि मापाड्याची कामे करण्यासाठी जालना शहरासह परिसरातील जामवाडी, देवमूर्ती, राममूर्ती, रेवगाव, मजरेवाडी, सारवाडी, दरेगाव, मांडवा, मान देऊळगाव, हिवरा राळा आदी गावांतील ग्रामस्थ कामांसाठी दररोज ये-जा करून मजुरी करत असतात.

यावर्षी आवक घटली
गतवर्षीपेक्षा५० टक्क्याने मालाची आवक घटली आहे. याचा परिणाम सर्वच क्षेत्रात जाणवू लागला आहे. बाजारपेठेवर अवलंबून असलेल्या हमाल, मापाडीसारख्या कामगारांनाही याचा फटका बसत आहे. पाऊस आल्यास बाजारपेठ सुरळीत होईल. '' गणेशचौगुले, सचिव,जालना कृषी उत्पन्न बाजार समिती, जालना

बाजारपेठेत शुकशुकाट
महिनाभरापासूनपाऊस नसल्यामुळे बाजारपेठेत मालाची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. शिवाय शहरातील मुख्य बाजारपेठेतही रोजगार मिळत नसल्यामुळे आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. सध्या कामगारांसमोर रोजगाराचा प्रश्न उभा ठाकला आहे. '' गजानननिकाळजे, हमाल,कृषी उत्पन्न बाजार समिती, जालना

रोजंदारीत मोठी घट
सध्याबाजारपेठेमध्ये आवक खूप होत असल्यामुळे ५० रुपयेही मिळणे अवघड झाले आहे. सध्या फक्त लिंबोळीची आवक होत आहे. मात्र, हमालांची संख्याही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तुलनेत हे काम हे खूप कमी ठरत आहे. पाऊस पडल्यानंतर परिस्थिती सुधारू शकते.''-प्रकाश नलावडे,हमाल,कृषी उत्पन्न बाजार समिती, जालना
बातम्या आणखी आहेत...