आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषिपंपांच्या उपशावर लगाम: १५ तास भारनियमन: जायकवाडी ०.१० टक्क्यांवर साठा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने जायकवाडीचा पाणीसाठा कमी होत आहे. बुधवारी रात्री साठा अवघा ०.१० टक्केच होता. गुरुवारी दुपारपर्यंत धरण मृतसाठा गाठेल. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने धरण क्षेत्रातील कृषिपंपांच्या भारनियमनात वाढ केली आहे. आठ तासांवरून १५ तासांवर भारनियमन करण्यात आले आहे. यामुळे पाण्याच्या उपशाला लगाम बसणार अाहे. दरम्यान, पाण्याअभावी जलविद्युत प्रकल्पही बंद करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे.
धरणाच्या पाण्यावर औरंगाबाद, जालन्यासह नगरमधील शेवगाव, अंबडसह सुमारे ३५० पेक्षा जास्त पाणी योजनेची मदार आहे. सध्या पिण्याच्या पाण्यात कपात नाही. मात्र, जायकवाडीतील खालावत जाणारा साठा आणि वरुणराजाने दिलेली ओढ अशीच कायम राहिली तर पिण्याच्या पाण्यातही कपात करण्याची वेळ येऊ शकते. यामुळे प्रशासन नियोजनात गुंतले आहे. धरण क्षेत्रातून होणारा कृषिपंपांचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, शेतकऱ्यांचा संताप पाहून त्यांना कृषिपंपांचा वीजपुरवठा बंद करता आला नाही. यावर तोडगा म्हणून त्यांनी कृषिपंपांच्या भारनियमनात वाढ केली आहे
. ८ तासांवरून १५ तास भारनियमन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांमधून संतापाच्या प्रतिक्रिया उमटत असल्या तरी भविष्यातील पाणीटंचाईचा प्रश्न उद््भवू नये म्हणून प्रशासन या निर्णयाप्रत आले आहे. पहिल्या टप्प्यात चार हजार उद्योगांचे १० टक्के पाणी कपात करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात कृषिपंपांच्या भारनियमनात वाढ करून येत्या एक-दोन दिवसांत ते पूर्णत: बंद करण्याचा निर्णयही होऊ शकतो, तशी चाचपणीही प्रशासन करत आहे. नोंदणीकृत आठ हजार कृषिपंपांतून रोज सुमारे १ दलघमी पाणीउपसा होतो. एका दिवसाच्या उपशातून औरंगाबाद, जालन्यासह ३५० पाणी योजनेतून ३ दिवस तहान भागू शकते.
गोदावरीचे पाणी ओढू नका, अधिकाऱ्यांना धमकी
वीज केंद्र पाण्याअभावी बंद झाल्याने गोदावरीचे पाणी धरणात परत घेतले जाण्याची शक्यता लक्षात घेऊन काही जणांनी अधिकाऱ्यांना धमकावले. गोदावरीतले पाणी परत धरणात घेऊ नका, अशी धमकी त्यांनी दिली.
३३ टक्के साठा असेल तरच शेतीला पाण्याची तरतूद
१५ ऑक्टोबरनंतर धरणाचा पाणीसाठा ३३ टक्क्यांवर असला तरच शेतीला पाणी देण्यात येते. यापूर्वी हाच नियम ४६ टक्क्यांवर होता.
साठा आणखी कमी झाल्यास अवैध उपसा बंद
‘दिव्य मराठी’त वृत्त प्रकाशित झाल्यामुळे तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. सर्व परिस्थितीची माहिती घेऊन उद्योगांची १० टक्के पाणी कपात करण्यात आली. धरणाच्या साठ्यात आणखी घट झाल्यास सर्व अवैध उपसा बंद करण्यात येईल.
वीरेंद्र सिंह, जिल्हाधिकारी, औरंगाबाद
जलविद्युत केंद्र पाण्याअभावी बंद
पाणीसाठ्यात कमालीची घट झाल्याने धरणाच्या पायथ्याशी असणारा व १२ मेगावॅट वीजनिर्मिती करणारा वीज प्रकल्प बुधवारपासून बंद पडला आहे. या वीज प्रकल्पाला धरणातून जे पाणी लागते ते पुन्हा धरणात परत पाठवले जाते. या प्रक्रियेमुळे वीजनिर्मितीला पाणी लागत नसले तरी धरण मृत साठ्याची पातळी गाठण्याच्या उंबरठ्यावर असल्याने हा प्रकल्प बंद करावा लागतो. दोन वर्षांपूर्वीही पाण्याअभावी हा प्रकल्प बंद ठेवावा लागला होता.

दोन दिवसांत वीज बंद करावी लागणार
धरण मृत साठ्यावर आले आहे. त्यामुळे नाइलाजास्तव धरणावरील कृषिपंप दोन दिवसांत बंद करण्यात येतील. सध्या भारनियमन पंधरा तास करण्यात आले आहे.
अशोक चव्हाण, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग.
मृत साठ्यामुळे बंद
धरण मृत साठ्यावर आल्याने वीज प्रकल्पाला पाणी मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे वीज प्रकल्प बंद ठेवावा लागत आहे. धरणाचा साठा जोपर्यंत जिवंत होत नाही तोपर्यंत वीज केंद्र बंद राहील. विद्याधर लोणीकर, अभियंता, वीज केंद्र
शेतीचे पाणी कदापि बंद करू देणार नाही
शेतीसाठी धरणाची निर्मिती झाल्याने शेतीचा पाणीपुरवठा कोणत्याही स्थितीत बंद करू देणार नाही. संत एकनाथ कारखाना याच जायकवाडीच्या पाण्यावर उभा राहिला. तालुक्यात आठ लाख टन ऊस उभा अाहे. या पाण्यावरच या उसाचे भवितव्य आहे. याच वेळी शेतीचा पाणीपुरवठा बंद करणे योग्य होणार नाही. हातातोंडाशी आलेला घास हिसकावू नये.
सचिन घायाळ
बातम्या आणखी आहेत...